बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय

पीटीआय
बुधवार, 31 मे 2017

लंडन - न्यूझीलंडपाठोपाठ बांगलादेशचा सराव सामन्यात २४० धावांनी धुव्वा उडवून भारताने चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेची जोरदार तयारी केली. रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांचे अपयश त्यानंतर विराट कोहली फलंदाजीस न येऊनही त्रिशतकी मजल मारणाऱ्या भारताच्या सर्वच गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली.

शिखर धवन (६०), दिनेश कार्तिक (निवृत्त ९४) आणि हार्दिक पंड्या (नाबाद ८०) यांच्या टोलेबाजीमुळे भारताने ५० षटकांत ७ बाद ३२४ धावा उभारल्या त्यानंतर बांगलादेशला ८४ धावांत गुंडाळले.

भुवनेश्‍वर कुमार आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट मिळवून बांगलादेशची ६ बाद २२ अशी अवस्था केली त्यानंतर केवळ निकालाची औपचारिकता शिल्लक होती. 

ढगाळ वातावरण असल्यामुळे बांगलादेशने भारताला प्रथम फलंदाजी दिली. चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी सज्ज होत असलेला रोहित शर्मा व आयपीएल गाजवणारा अजिंक्‍य रहाणे लवकर बाद झाल्यावर भारतावर दडपण येण्याची चिन्हे दिसत होती; परंतु बदली खेळाडू म्हणून ऐन वेळी संघात समावेश झालेल्या दिनेश कार्तिकने शिखर धवनसह शतकी भागीदारी करून डाव तर सावरलाच; पण स्थैर्यही मिळवून दिले. 

अर्धशतकानंतर धवन बाद झाला आणि इतरांना फलंदाजीची संधी मिळावी म्हणून कार्तिकलाही ९४ धावांवर निवृत्त करण्यात आले. वास्तविक त्या वेळी १४ षटकांचा खेळ शिल्लक होता. केदार जाधवनेही चांगली सुरवात केली; परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि तो ३१ धावांवर बाद झाला. 

भारताला ३०० च्या पलीकडे मजल मारून देण्यामध्ये हार्दिक पंड्याचा वाटा निर्णायक होता. त्याने सहा चौकार व चार षटकारांची टोलेबाजी करून ५४ चेंडूंतच नाबाद ८० धावांची खेळी उभारली. या सामन्यात धोनीला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे दिनेश कार्तिकने यष्टिरक्षण केले. तापातून सावरणाऱ्या युवराज सिंगलाही विश्रांती देणे संघ व्यवस्थापनाने पसंत केले. 

संक्षिप्त धावफलक 
भारत ः ५० षटकांत ७ बाद ३२४ (रोहित शर्मा १, शिखर धवन ६०-६७ चेंडू, ७ चौकार, अजिंक्‍य रहाणे ११, दिनेश कार्तिक निवृत्त ९४-७७ चेंडू, ८ चौकार, १ षटकार, केदार जाधव ३१-३८ चेंडू, २ चौकार, १ षटकार, हार्दिक पंड्या नाबाद ८०-५४ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार; रुबेल हुसैन ३-५०, सुनझामुल इस्लाम २-७४). वि. वि. बांगलादेश ः २३.५ षटकांत सर्वबाद ८४ (मेहदी हसन मिराझ २४, सुनझामुल इस्लाम १८, भुवनेश्‍वर कुमार ३-१३, उमेश यादव ३-१६, शमी १-१७, पंड्या १-२, अश्‍विन १-२)