किवींच्या पदरी भारताकडून पराभवाची छटा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली - विक्रम, पदार्पण, अलविदा अशा वैविध्यपूर्ण छटा लाभलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवीत तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

नवी दिल्ली - विक्रम, पदार्पण, अलविदा अशा वैविध्यपूर्ण छटा लाभलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवीत तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
नाणेफेकीचा कौल किवी कर्णधार केन विल्यम्सन याच्या बाजूने लागला. त्यानंतर मात्र प्रत्येक फासे भारताच्या बाजूने पडले. रोहित-धवन यांनी विक्रमी सलामी दिली. त्यामुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 202 धावसंख्या उभारली. किवींसाठी हे आव्हान आवाक्‍याबाहेरचे ठरले. त्यांना आठ बाद 149 इतकीच मजल मारता आली.

धवन-रोहितने 158 धावांची सलामी दिली. ही कोणत्याही विकेटसाठी भारतातर्फे विक्रमी भागीदारी ठरली. यापूर्वी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट-रोहित यांनी 138 धावांची भागीदारी रचली होती. अंतिम टप्यात विराट आणि धोनी यांनी टोलेबाजी करीत भारताला द्विशतकी टप्पा पार करून दिला. रोहितला 16 धावांवर जीवदान मिळाले. त्याने मिचेल सॅंटनरला षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. धवनलाही जीवदान मिळाले.

नेहराला बहुमान
दिल्ली-जिल्हा क्रिकेट संघटनेने (डीडीसीए) नेहराला अनोखी मानवंदना दिली. फिरोजशाह कोटला मैदानाच्या एका बाजूला आशिष नेहरा एन्ड असे नाव देण्यात आले. हा एन्ड पूर्वी डॉ. आंबेडकर स्टेडियम या नावाने ओळखला जात होता. मंगळवारी गेट क्रमांक दोनला वीरेंद्र सेहवागचे नाव देण्यात आले होते.

संक्षिप्त धावफलक
भारत - 20 षटकांत 3 बाद 202 (रोहित शर्मा 80-55 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार, शिखर धवन 80- 52 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार, विराट कोहली नाबाद 26-11 चेंडू, 3 षटकार, धोनी नाबाद 7-2 चेंडू, 1 षटकार, ट्रेंट बोल्ट 4-0-49-1, टीम साऊदी 4-0-44-0, ईश सोधी 4-0-25-2) वि.वि. न्यूझीलंड ः 20 षटकांत 8 बाद 149 (मार्टिन गुप्तिल 4, केन विल्यम्सन 28-24 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, टॉम लॅथम 39-36 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, मिचेल सॅंटनर 27-14 चेंडू, 2 चौकार, 2 षटकार, आशिष नेहरा 4-0-29-0, युजवेंद्र चहल 4-0-26-2, अक्षर पटेल 4-0-20-2)

अय्यरचे पदार्पण, नेहराचा अलविदा
या सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यरने पदार्पण केले, पण त्याला फलंदाजीची संधी मिळू शकली नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराने घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. त्याला चार षटकांत एकही विकेट मिळू शकली नाही.