भारतीय महिलांचा विजयी चौकार

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

डर्बी - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने विजयाचा ‘चौकार’ मारला. श्रीलंकेचा १६ धावांनी पराभव करून सलग चौथ्या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा अधिक बळकट केल्या. दीप्ती शर्मा (७८) आणि मिताली राज (५३) यांची शतकी भागादारी आणि झुलन गोस्वामी, पूनम यादव यांचे गोलंदाजीतील योगदान निर्णायक ठरले.

डर्बी - महिला विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने विजयाचा ‘चौकार’ मारला. श्रीलंकेचा १६ धावांनी पराभव करून सलग चौथ्या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा अधिक बळकट केल्या. दीप्ती शर्मा (७८) आणि मिताली राज (५३) यांची शतकी भागादारी आणि झुलन गोस्वामी, पूनम यादव यांचे गोलंदाजीतील योगदान निर्णायक ठरले.

प्रथम फलंदाजी करताना २३३ धावा करणाऱ्या भारताला आजच्या विजयासाठी मात्र अखेरपर्यंत संघर्ष करावा लागला. सामन्यात भारताचे वर्चस्व होते; परंतु श्रीलंकेने अखेरच्या षटकापर्यंत झुंजवले. पहिल्या तिन्ही विजयांत भारताच्या गोलंदाजांनी भरीव कामगिरी केलेली आहे. आज त्यांच्यासाठी पुरेसे पाठबळ होते. श्रीलंकेची ३ बाद ७० आणि ५ बाद १४३ अशी अवस्था करून विजयाकडे मार्गक्रमण केले होते, दिलानी सुरांगिका (६१) आणि वीरकोडी (२१) यांनी भारताचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.

तत्पूर्वी, दीप्ती (७८) आणि कर्णधार मिताली (५३) यांच्या ११८ धावांच्या भागीदारीमुळे भारताने २३२ धावांपर्यंत मजल मारली. दीप्ती बाद झाल्यानंतर पिंच हिटर म्हणून बढती देण्यात आलेली झुलन गोस्वामी आणि मिताली राज सलग चेंडूंवर बाद झाल्यामुळे एकाच वेळी दोन नव्या फलंदाज मैदानात आल्या आणि परिणामी धावांचा वेग मंदावला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जखडून जरूर ठेवले होते. पण, त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडून भारतीय फलंदाजांना जणू मदतच केली. 

हरमनप्रीत आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी  जम बसल्यानंतर जवळपास चेंडू मागे एक धाव या गतीने सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, पण त्याही सलग दोन चेंडूंवर बाद झाल्यामुळे पुन्हा धावांच्या वेगाला वेसण बसली. 

संक्षिप्त धावफलक
भारत ः ५० षटकांत ८ बाद २३२ (दीप्ती शर्मा ७८ -११० चेंडू, १० चौकार, मिताली राज ५३ -७८ चेंडू, ४ चौकार, हरमनप्रीत कौर २० -२२ चेंडू, १ चौकार, वेदा कृष्णमूर्ती २९ -३३ चेंडू, ४ चौकार, वीरकोडी ९-२-२८-३, रनवीरा १०-०-५५-२) वि.वि. श्रीलंका ः ५० षटकांत ७ बाद २१६ (निपुणी हसिंका २९, सिरीवर्धने ३७, दिलानी सुरांगिका ६१ -७५ चेंडू, ६ चौकार, प्रसादिनी वीरकोडी नाबाद २१, झूलन गोस्वामी ८-२-२६-२, पूनम यादव १०-१-२३-२).