एलओसी म्हणजे ‘लाइन ऑफ क्रिकेट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

पुणे - ‘एलओसी’चा म्हणजे लाइन ऑफ कंट्रोल हे कितीही खरे असले तरी या मुलांनी ती सीमाही ओलांडली आहे. त्यांच्या मते ‘एलओसी’ म्हणजे ‘लाइन ऑफ क्रिकेट’. खेळ कुठलाही असो, त्याने मने जोडली जातात. हे इथे म्हणजे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या उरी गावाने खऱ्या अर्थाने अनुभवले आहे. म्हणूनच केवळ क्रिकेट खेळण्याच्या वेडाने या गावातील मुले गाव सोडून पुण्यात खरे क्रिकेट खेळायला आली आहेत.

वर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात १७ भारतीय जवान शहीद  झाले. हा हल्ला याच गावात झाला होता. कश्‍मीरपेक्षा काहीशी वेगळी परिस्थिती या गावात दिसून येते. सीमेपलीकडून पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारानेच जणू त्यांचा दिवस उजाडतो. त्यामुळेच कश्‍मीर खोऱ्यात काम करणाऱ्या पुण्यातील असीम फाउंडेशनने सेना दल आणि नागरिक यांच्यातील दुवा बनत त्यांची मने जोडण्याचा उपक्रम हाती  घेतला. त्यासाठी निवड  केली क्रिकेटची. कालापहाड ब्रिगेडच्या सोबत उपक्रम राबवून तेथे उरी प्रीमियम लीग  यशस्वी झाली आणि स्पर्धेतील एक सर्वोत्तम  संघ आता त्यांनी पुण्यात मैत्रीपूर्ण लढत खेळविण्यासाठी आणला.

या संदर्भात या पहाडी गावातील खेळाडूंचा कर्णधार अय्याझ लोन म्हणाला, ‘‘आम्ही क्रिकेट खेळतो. आमच्यात कसलीही भीती नाही. खेळाला कुठली सीमा आली. आम्ही बिनधास्त खेळतो. फक्त आमचे खेळणे हे अपरिपक्व आहे. आमच्याकडे फारशी साधने नाहीत. मैदाने नाहीत. प्रशिक्षक मुळीच नाहीत. तरी टी.व्ही. वर दाखवणाऱ्या जाणारे क्रिकेट बघून आम्ही तसे खेळतो. त्यामुळेच असिम फाउंडेशन आणि सुनंदन लेले यांनी आयोजित केलेला हा दौरा आम्हाला खूप अनुभवी ठरला. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, पूर्वतयारी अशा सगळ्याच आघाड्यांवर आम्हाला महत्त्वाच्या टिप्स मिळाल्या. आता आम्ही उरीला जाऊन आमच्या अन्य खेळाडूंना त्याचा उपयोग करून देऊ शकू.’’

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने व्हिडियो कॉन्फरन्स द्वारे या खेळाडूंशी संवाद साधला होता.