महाराष्ट्र रणजी प्रशिक्षकपदी भावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे - आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी सुरेंद्र भावे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांच्याकडे वरिष्ठ निवड समिती अध्यक्षपदासह युवा संघाचे प्रशिक्षकपद अशा दोन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

पुणे - आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी सुरेंद्र भावे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांच्याकडे वरिष्ठ निवड समिती अध्यक्षपदासह युवा संघाचे प्रशिक्षकपद अशा दोन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे चिटणीस रियाझ बागवान यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार व्यवस्थापकीय समितीची बैठक बुधवारी पार पडली. रणजी निवड समितीवर योगेश दोशी व के. व्ही. जोशी सदस्य असतील. कल्याणी यांच्याआधी डेव्हीड अँड्रयूज व त्याआधी भावे प्रशिक्षक होते. भावे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने २०१३-१४ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. कर्नाटकविरुद्ध महाराष्ट्राचा पराभव झाला होता. ‘क’ गटातून महाराष्ट्राने प्रेरणादायी कामगिरी केली होती. त्यानंतरच्या मोसमात महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली होती. नंतर भावे यांनी हरियाना संघाशी करार केला होता. या वेळी भावे यांचे सहायक म्हणून अक्षय तांदळे, शेखर गवळी ट्रेनर, तर महंमद पूनावाला व्यवस्थापक असतील.

दुसरी संधी महत्त्वाची
भावे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा प्रशिक्षक म्हणून मला दुसरी संधी मिळणे महत्त्वाचे आहे. संघाचा पाया भक्कम आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात सराव शिबीर सुरु होईल.

हमीपत्राची अट
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ॲड. अभय आपटे यांनी सांगितले, की कराराच्या प्रक्रियेचा भाग म्हणून विविध समित्यांवरील पदांवर नियुक्त झालेल्यांना हमीपत्र द्यावे लागेल. परस्परविरोधी हितसंबंधांचा मुद्दा आड येऊ नये हाच यामागील उद्देश आहे.

इतर समित्या - २३ वर्षांखालील निवड समिती - अध्यक्ष - के. व्ही. जोशी. सदस्य - राहुल ढोले पाटील, राजेश केळावकर. प्रशिक्षक - जयदीप नरसे. सहायक प्रशिक्षक - आशिष सूर्यवंशी. १९ वर्षांखालील समिती - अध्यक्ष - प्रशांत राय. सदस्य - मंगेश वैद्य, राजेंद्र कोंढाळकर. प्रशिक्षक - श्रीकांत कल्याणी, सहायक प्रशिक्षक - गणेश सूर्यवंशी. १६ व १४ वर्षांखालील समिती - अध्यक्ष - कैसर फकी. सदस्य - राजू काणे, कौस्तुभ कदम. प्रशिक्षक - शेखर घोष. सहायक प्रशिक्षक-व्यवस्थापक - अजय चव्हाण. वरिष्ठ महिला व २३ वर्षांखालील - अध्यक्ष - प्रदीप देशमुख. सदस्य - संजय कोंढाळकर, कल्पना तापीकर. प्रशिक्षक - शंकर दळवी. फिजिओ - अनघा शिंदे. वरिष्ठ संघ व्यवस्थापिका - माधवी चिटणीस. २३ वर्षांखालील संघ व्यवस्थापिका - राजश्री अडबाल. १९ वर्षांखालील महिला - अध्यक्ष - प्रमोद क्षिरे. सदस्य - विजय भोसले, श्‍यामकांत देशमुख. प्रशिक्षक - फिरोज शेख.

सीओसी सर्वसमावेशक करणार
महाराष्ट्र क्रिकेटचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सीओसी (क्रिकेट ऑपरेशन्स कमिटी) सर्वसमावेशक केली जाईल. त्यात अधिकाधिक सक्षम माजी खेळाडूंना सामावून घेतले जाईल. क्रिकेट संचालक हे पद निर्माण केले जाईल. माजी खेळाडूंच्या अनुभवाचा राज्याच्या क्रिकेटला भरीव फायदा व्हावा हाच उद्देश असल्याचे ॲड. आपटे यांनी सांगितले.