महंमद शमी, उमेशचे वन-डेसाठी पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

लखनौ - काही महिन्यांपूर्वी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करताना निर्णायक कामगिरी करणाऱ्या आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय टीम इंडिया त्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता एकदिवसीय मालिकेत सामना करणार आहे. या पुढच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला.

एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने श्रीलंका दौऱ्यात घवघवीत यश मिळवलेल्या संघात फारसे बदल केले नाहीत. फिरकीसाठी यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावरच भरवसा ठेवला. वेगवान गोलंदाजीत महंमद शमी आणि उमेश यादव यांचे पुनरागमन करून मुंबईकर शार्दूल ठाकूरला मात्र वगळले.

श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिकेत दहा बळी मिळवणाऱ्या शमीसह उमेश यादवलाही विश्रांती दिली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धचे महत्त्व ओळखून त्यांची पुन्हा निवड केली; मात्र अश्‍विन आणि जडेजा यांना मोठा ‘ब्रेक’ मिळण्याची शक्‍यता आहे. जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे, तर अश्‍विन इंग्लिश कौंटी स्पर्धेत वॉर्कशायरकडून खेळत आहे.

शार्दूल, बावणे ‘अ संघात
श्रीलंका दौऱ्यानंतर शार्दूल ठाकूरला आता वगळण्यात आले असले तरी त्याची भारत ‘अ’ संघात निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध चार दिवसांचे दोन सामने आहेत. या संघात  मुंबईचा श्रेयस अय्यर आणि महाराष्ट्राच्या अंकित बावणेची निवड झाली आहे. 

संघ 
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्‍य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव आणि महंमद शमी.