शास्त्रींचा अधिकृत अर्ज दाखल

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सोमवारी अखेर रवी शास्त्री यांनी अधिकृतपणे आपला अर्ज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) सादर केला. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची मुदत बीसीसीआयने वाढवल्यानंतर इच्छुकांची यादी वाढत आहे. वेस्ट इंडीजचे माजी सलामीवीर फिल सिमन्स यांनीही शर्यतीत उडी घेतली आहे.

‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, आता त्यांच्यासह प्रशिक्षकपदासाठी वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, वेंकटेश प्रसाद, रिचर्ड पिबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत आणि फिल सिमन्स हे उमेदवार शर्यतीत राहणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ९ जुलै असून, १० जुलै रोजी मुंबईत सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण ही सल्लागार समिती या सर्वांच्या मुलाखती घेणार आहे.

यापूर्वीच्या प्रशिक्षक निवडीच्या मुलाखती दरम्यान सौरभ गांगुली यांनी शास्त्री ऐवजी कुंबळे यांना पाठिंबा दिला होता. त्या वरून देखील खूप वाद झाला होता. आता कर्णधार कोहलीसह बहुतेक खेळाडूंचाही शास्त्री यांच्या नावाला पाठिंबा मिळत असल्यामुळे सल्लागार समिती या वेळी शास्त्री यांच्या अर्जाचा कसा विचार करते याकडे सर्वांच्या नजरा लागून असतील.

सिमन्सही शर्यतीत
फिल सिमन्स यांनी प्रशिक्षक म्हणून आपला ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या मार्गदशनाखाली वेस्ट इंडीजने गेल्या वर्षी विश्‍वकरंडक ट्‌वेन्टी-२० स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. संघातील खेळाडूंमध्ये चांगली वागणूक निर्माण करण्यात अपयश आल्याबद्दल विंडीज क्रिकेट मंडळाने त्यांना पदावरून दूर केले होते. सिमन्स यांनी अफगाणिस्तान संघालाही मार्गदर्शन केले आहे.