प्रशिक्षकपदासाठी शास्त्रीचादेखील अर्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर आणि बीसीसीआयने इच्छुकांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविल्यानंतर रवी शास्त्री टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरणार आहे. आपण मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदाची खात्री मिळणार असेल, तरच आपण अर्ज करणार असल्याच्या वृत्ताचा मात्र त्यांनी इन्कार केला. 

रवी शास्त्री हे २०१४ ते २०१६ या कालावधीत संघव्यवस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक होते. या काळात भारतीय संघाने २०१५ मधील ऑस्ट्रेलियातील ५०-५० षटकांच्या आणि त्यानंतर भारतात झालेल्या ट्‌वेन्टी-२० स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. २०१६ मध्ये नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाल्यावर शास्त्री यांच्यासह अनिल कुंबळे यांनीही अर्ज केला. त्या वेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने शास्त्री यांच्याऐवजी अनिल कुंबळे यांची निवड केली होती; परंतु त्यांचा करार एका वर्षाचाच होता.

कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने वेस्ट इंडीज, श्रीलंका यांच्यानंतर मायदेशात न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यासोबत न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही यश मिळवले. त्यानंतर आता चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.

कुंबळे यांचा एका वर्षाचा करार संपत असल्यामुळे बीसीसीआयने प्रशिक्षक नेमण्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू केली. त्यातच कुंबळे आणि कर्णधार कोहली यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागला. कुंबळे यांच्या मुदतवाढीला कोहलीने विरोध केला असला, तरी सल्लागार समितीने कुंबळेंवरच विश्‍वास दाखवला. मात्र कुंबळे यांनी राजीमामा दिला. 

प्रशिक्षपदाच्या पहिल्या मुदतीत शास्त्री यांनी अर्ज केला नव्हता. आता कुंबळे शर्यतीत नसल्यामुळे शास्त्री यांचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र अगोदर अर्ज केलेल्या वीरेंद्र सेहवाग, लालचंद राजपूत यांच्यावर हा अन्याय आहे, अशीही चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात केली जात आहे.