श्रीलंका विश्‍वकरंडकासाठी पात्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

लंडन - इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा झालेला पराभव अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या पथ्यावर पडला आहे. विंडीजच्या या पराभवामुळे श्रीलंका संघ २०१९ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे. 

लंडन - इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा झालेला पराभव अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या पथ्यावर पडला आहे. विंडीजच्या या पराभवामुळे श्रीलंका संघ २०१९ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे. 

विश्‍वकरंडक २०१९ स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार असून, या स्पर्धेत दहाच संघ खेळणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या आठ संघांना या स्पर्धेसाठी थेट पात्र धरण्यात येणार होते. क्रमवारीत ३० सप्टेंबर रोजी जाहीर होणारे मानांकन यासाठी ग्राह्य धरण्यात येणार होते. त्यानुसार ८६ मानांकन गुण असलेले श्रीलंका आठव्या स्थानावर राहणार असून, विंडीज संघाचे सध्या ७८ गुण आहेत. त्यामुळे त्यांना विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळण्यासाठी पात्रता फेरीचा आधार घ्यावा लागणार आहे. 

मानांकन यादीसाठी असलेल्या अंतिम मुदतीपर्यंत श्रीलंकेचे सर्व सामने संपले होते. अलीकडच्या अपयशी कामगिरीमुळे ते ८६ गुणांवर अडकले होते. विंडीजचे ७८ गुण होते. विंडीज अंतिम मुदतीपर्यंत आयर्लंडशी एक, तर इंग्लंडशी पाच एकदिवसीय सामने खेळणार होते. या सहापैकी विंडीजला श्रीलंकेला मागे टाकण्यासाठी किमान पाच सामने जिंकणे आवश्‍यक होते.

मात्र, यातील आयर्लंडविरुद्ध विजयाची खात्री असलेला विंडीजचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही, तर इंग्लंडविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे श्रीलंकेचा विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. माजी विजेत्यांवर मात्र आता पात्रता फेरी खेळण्याची नामुष्की ओढावली. पात्रता फेरीत अफगाणिस्तान, झिंबाब्वे आणि आयर्लंड या चार संघांसह ‘वर्ल्ड क्रिकेट लीग’मधील सर्वोत्तम चार आणि ‘वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन २’ मधील दोन संघ खेळणार आहेत. या संघांमध्ये होणाऱ्या पात्रता फेरीतील दोन संघ विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरतील.

बेअरस्टॉचे शतक
लंडन - जॉनी बेअरस्टॉने झळकाविलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा सात गडी राखून पराभव केला. संक्षिप्त धावफलक - वेस्ट इंडिज ९ बाद २०४ (जेसन होल्डर नाबाद ४१, बेन स्टोक्‍स ३-४३) पराभूत वि. इंग्लंड ३ बाद २१० (जॉनी बेअरस्टॉ नाबाद १००, ज्यो रुट ५४)

पात्र संघ 
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका.