भारताविरुद्धची मालिका खेळीमेळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कसोटी मालिकेसाठी फिरकीस पोषक असलेल्या खेळपट्ट्या या मालिकेत नसतील, अशी आशा आहे; तरीही परिस्थितीशी जुळवून घेऊन आम्हाला खेळ करावा लागणार आहे.
- स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलिया कर्णधार

ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव स्मिथचा आशावाद

चेन्नई - काही महिन्यांपूर्वीच्या कसोटी मालिकेतील ‘संघर्षा’च्या आठवणी ताज्या असल्या, तरी आता सुरू होणारी भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका चांगल्या खेळीमेळीत होईल, असा विश्‍वास ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने व्यक्त केला. विराट कोहलीला ‘शांत’ ठेवणे हेच आमच्यासाठी यशाचे गमक ठरू शकेल, असेही तो म्हणाला.

भारताविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशमधील कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर काल भारतात दाखल झाला. एरवी आव्हानाची भाषा बोलणारे ऑस्ट्रेलियन या वेळी मात्र सावध असल्याचे स्टीव स्मिथच्या पहिल्या पत्रकार परिषदेतून दिसून आले.  
नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात विराट कोहली चांगलाच बहरला होता.

सलग दोन शतकांसह त्याने ३३० धावा फटकावल्या. त्याचबरोबर त्याने ३० वे शतक करून रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या तुलनेत स्मिथच्या नावावर आठ शतकेच आहेत. दोघांमधल्या शतकांच्या फरकाकडे स्मिथ गांभीर्याने पाहत नाही. तो निश्‍चितच मोठा फलंदाज आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची आकडेवारी त्याची महानता स्पष्ट करते; परंतु या मालिकेत आम्ही त्याला जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करू. यात जर यश मिळवले, तर आम्हाला मालिकेत चांगले यश मिळवता येईल, असे स्मिथने सांगितले.

कसोटी मालिकेसाठी स्मिथचा ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा भारतात आला होता तेव्हा डीआरएसच्या निर्णयाबाबत त्याने ड्रेसिंग रूमकडे पाहून विचारणा केली होती. आपली चोरी पकडली गेली हे लक्षात येताच त्याने ‘ब्रेन फेड’ असे संबोधत या प्रकरणाला बगल दिली होती. या वेळी असे कोणताही वाद होणार नाही, असा विश्‍वास त्याने व्यक्त केला.

या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारताने अश्‍विन आणि जडेजा यांना विश्रांती दिली आहे. कसोटीच्या तुलनेत हा वेगळा प्रकार (एकदिवसीय) आहे. या पकारात अक्षर पटेलने चांगले यश मिळवले आहे. चाहल आणि कुलदीपही तेवढ्याच क्षमतेचे फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे अश्‍विन-जडेजा नसले, तरी भारताकडे चांगले फिरकी गोलंदाज आहेत, असे स्मिथने सांगितले.

कसोटी मालिकेसाठी फिरकीस पोषक असलेल्या खेळपट्ट्या या मालिकेत नसतील, अशी आशा आहे; तरीही परिस्थितीशी जुळवून घेऊन आम्हाला खेळ करावा लागणार आहे.
- स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलिया कर्णधार