महिलांची आयपीएल तूर्त तरी अशक्‍य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या कामगिरीचे कौतुक झाल्यावर कर्णधार मिताली राजने महिलांची आयपीएल सुरू करण्याची मागणी केली; पण ही लीग सध्याच्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार नाही, त्याचबरोबर भारतीय मंडळाची सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यास या मोसमात तरी ही लीग अशक्‍य असल्याचेच सांगितले जात आहे.

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग खेळल्याचा स्मृती मानधना तसेच हरमनप्रीत कौरला खूपच फायदा झाला. महिलांची आयपीएल झाली, तर खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असेच सांगितले जात आहे. कोलकता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर याने तर पुरुषांच्या आयपीएलच्याच दिवशी दुपारी महिलांच्या आयपीएल लढती होऊ शकतील, असे सांगितले आहे.

भारतीय महिला क्रिकेटपटूंनी देशाची शान नक्कीच उंचावली आहे; पण त्यांच्यासाठी आयपीएल घेणे हा जरा धाडसीच विचार झाला. सध्याची परिस्थितीही लक्षात घ्यायला हवी. लोढा समितीच्या शिफारशीमुळे भारतीय क्रिकेट मंडळाचे प्रशासन कोलमडले आहे. त्यामुळे महिलांची आयपीएल तूर्तास तरी अवघड आहे, असे भारतीय क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.