यशोमालिका राखण्याचे भारतीय महिलांचे लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

टाँटन - विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेत भारताने सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंडचा पाडाव केला होता. आता मिताली राजचा संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या यशाची आशा बाळगून आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ही लढत उद्या टाँटन येथे होईल. 

पूनम राऊत व स्मृती मानधना या सलामीच्या फलंदाजांमुळे भारताने २८१ धावा केल्या होत्या. त्यानंतर दीप्ती शर्माने इंग्लंडला २४६ धावांत रोखण्यात मोलाची मदत केली होती. इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या लढतीपूर्वी आमच्या संघातील केवळ चार-पाच मुलींनाच विश्‍वकरंडक स्पर्धेचा अनुभव होता. ही बाब लक्षात घेतल्यास सलामीच्या विजयाचे महत्त्व जास्त वाढते. गटातील अजून सहा लढती शिल्लक आहेत. सलामीचाच फॉर्म कायम राहील, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक सामन्यागणिक आमची कामगिरी उंचावेल, अशी अपेक्षा कर्णधार मितालीने व्यक्त केली. 

पूनम, तसेच स्मृतीने सुरवातीची २५ षटके खेळल्यामुळे आमचे काम सोपे झाले. वेस्ट इंडीजविरुद्धही त्यांच्याकडून याच कामगिरीची आम्हाला अपेक्षा आहे. त्यांनी भक्कम सुरवात दिली आणि त्याचा मधल्या फळीने फायदा घेतला, तर अडीचशे धावा सहज होऊ शकतात. महिला क्रिकेटमध्ये ही नक्कीच चांगली धावसंख्या असेल, असे मितालीने स्पष्ट केले. भक्कम भागीदारीकडे आमचे लक्ष असेल, असे वेस्ट इंडीजची अव्वल फलंदाज चेदियन नेशन हिने सांगितले.