फिरकीच्या आखाड्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया पराभूत

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

गॉल : फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाची भंबेरी उडते, हे पुन्हा एकदा सिद्ध करत श्रीलंकेने दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातही 229 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह श्रीलंकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिकाही जिंकली. फिरकीचा आखाडा बनलेल्या या खेळपट्टीवर अडीच दिवसांतच निकाल लागला. श्रीलंकेने दिलेल्या 413 धावांच्या अशक्‍यप्राय आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 183 धावांत संपुष्टात आला. आशिया खंडातील हा ऑस्ट्रेलियाचा सलग आठवा पराभव आहे. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे, तर श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे.

अनुभवी फिरकी गोलंदाज रंगना हेराथ आणि दिलरुवान परेरा यांच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही सपशेल नांगी टाकली. या दोघांनी मिळून दुसऱ्या डावात आठ फलंदाज बाद केले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 41 धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या कुठल्याही फलंदाजाकडून समर्थ साथ लाभली नाही. मालिका गमावण्याचा दिसत असलेला धोका, धावांचा डोंगर आणि फिरकीला कमालीची साथ देणारी खेळपट्टी यांसमोर ऑस्ट्रेलियाचे सर्वच फलंदाज हतबल झाले होते. दिलरुवान परेराने एकाच सामन्यात दहा बळी आणि अर्धशतक अशी अफलातून कामगिरी करत श्रीलंकेच्या ऐतिहासिक विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यालाच ‘सामनावीर‘ घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका : पहिला डाव : सर्वबाद 281
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : सर्वबाद 106
श्रीलंका : दुसरा डाव : सर्वबाद 237
विजयासाठी आव्हान : 413
ऑस्ट्रेलिया : दुसरा डाव : सर्वबाद 183
निकाल : श्रीलंकेचा 229 धावांनी विजय