घरच्या मैदानावर महाराष्ट्र ‘रेल्वे’ रोखणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुणे - कर्नाटकाकडून निर्णायक पराभव पत्करावा लागल्यावर आता महाराष्ट्र रणजी करंडक लढतीत उद्यापासून ‘रेल्वे’ रोखण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे. महाराष्ट्र आणि रेल्वे संघांदरम्यान उद्यापासून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर रणजी लढत सुरू होत आहे.

पुणे - कर्नाटकाकडून निर्णायक पराभव पत्करावा लागल्यावर आता महाराष्ट्र रणजी करंडक लढतीत उद्यापासून ‘रेल्वे’ रोखण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे. महाराष्ट्र आणि रेल्वे संघांदरम्यान उद्यापासून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर रणजी लढत सुरू होत आहे.

कर्नाटकविरुद्धच्या लढतीत महाराष्ट्राला फलंदाजी आणि गोलंदाजी अशा आघाड्यांवर साफ अपयश आले होते. कर्णधार अंकित बावणेचे अपयश यजमान संघाला नक्कीच सतावणारे ठरले. राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड यांनी कर्नाटकविरुद्ध अर्धशतकी खेळी उभारल्या पण, त्यांना त्या खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नव्हते. स्वप्नील गुगळे आणि हर्षद खडीवाले यांना देखील अजून सूर गवसलेला नाही. त्यामुळे रेल्वेविरुद्ध खेळताना महाराष्ट्राच्या फलंदाजांना आपले योगदान द्यावेच लागेल. गोलंदाजीतही फारसे वेगळे चित्र नाही. चिराग खुराणाचा फिरकी मारा वगळता महाराष्ट्राचे मध्यमगती गोलंदाज साफ अपयशी ठरले आहेत. 

महाराष्ट्राच्या तुलनेत रेल्वे गुणांचा विचार केल्यास कांकणभर सरस आहे. ते १३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत चार पैकी दोन सामन्यात विजय मिळविला आहे. अरिंदम घोष, नितीन भिले यांच्यातील सातत्यपूर्ण  फलंदाजीला आशिष यादव, शिवकांत शुक्‍ल, अनुरित सिंग यांची पूरक साथ मिळत आहे. त्यावेळी अनुरितचा मध्यमगती मारा हे रेल्वेचे प्रमुख अस्त्र राहिल. त्याने या मोसमात आतापर्यंत १९ गडी बाद केले आहेत. दीपक बन्सल आणि अविनाश यादव या गोलंदाजांच्या कामगिरीतही सातत्य राहिले असल्याने महाराष्ट्राच्या फलंदाजांना आव्हान राखण्यासाठी मैदानात टिच्चून उभे राहावे लागेल. महाराष्ट्राचे केवळ सात गुण असून, ते पाचव्या स्थानावर आहेत.