आयपीएलचा खेळ आता स्टार स्पोर्टसवरून

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

आयपीएलच्या प्रसारणासाठी भारतात प्रसिद्ध असलेल्या स्टार इंडिया, सोनी नेटवर्क या टीव्ही वाहिन्यांनी अंतिम बोली लावली होती. यामध्ये स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत प्रसारणाचे हक्क मिळविले. 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठी स्टार इंडियाकडे प्रसारणाचे हक्क असणार आहेत. तर ट्‌विटर आणि फेसबुकही हे हक्क मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. 

मुंबई : केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर क्रिकेट विश्‍वात प्रसिद्ध असलेल्या आयपीएल प्रसारणाचे पुढील पाच वर्षांचे हक्क स्टार स्पोर्टस या वाहिनीने मिळविले आहे. सोनीला मागे टाकत स्टार इंडियाने 16,347.50 कोटी रुपयांना हे हक्क विकत घेतले आहेत. 

आयपीएलच्या प्रसारणासाठी भारतात प्रसिद्ध असलेल्या स्टार इंडिया, सोनी नेटवर्क या टीव्ही वाहिन्यांनी अंतिम बोली लावली होती. यामध्ये स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत प्रसारणाचे हक्क मिळविले. 2018 ते 2022 या पाच वर्षांसाठी स्टार इंडियाकडे प्रसारणाचे हक्क असणार आहेत. तर ट्‌विटर आणि फेसबुकही हे हक्क मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. 

दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या लीगने भारतीय क्रिकेटला अधिक श्रीमंत केले. आता होणारा नवा करार मालामाल करणारा आहे. 20 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेला हे हक्क विकले जाण्याचा अंदाज बीसीसीआय करत होते. मात्र, प्रसारणाचे हक्क 16 हजारांहून अधिक कोटींना विकले गेले आहेत. आयपीएल सुरू झाल्यापासून म्हणजेच 2008 ते 2017 या 10 वर्षांसाठी सोनीने 8,200 कोटींना हे हक्क मिळवले होते. तर 2015 मध्ये तीन वर्षांसाठी ग्लोबल डिजिटल हक्क नोव्ही डिजिटलने 302.2 कोटींमध्ये मिळवले होते. 

यंदा प्रसारणाचे हक्क प्रसारण आणि डिजिटल (इंटरनेट व मोबाईल) अशा दोन विभागांत होणार आहेत. भारतीय उपखंडासाठी वेगळे टीव्ही हक्क त्याच वेळी उपखंडासाठी वेगळे डिजिटल हक्क देण्यात येतील. आखाती देश, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा उपखंडाबाहेरील मार्केटसाठी वेगळे प्रसारण हक्क देण्यात येतील. 

इच्छुक असलेल्या 18 दिग्गज कंपन्या
स्टार इंडिया, अमेझॉन सेलर सर्व्हिस, फॉलोवोन इंटरॅक्टिव्ह मीडिया, ताज टीव्ही इंडिया, सोनी पिक्‍चर्स नेटवर्क, टाइम्स इंटरनेट, सुपरस्पोर्ट इंटरनॅशनल, रिलायन्स जिओ डिजिटल, गल्फ डीटीएच, ग्रुप एम मीडिया, बेईन, इकोनेट मीडिया, स्काय यूके, ईएसपीएन डिजिटल मीडिया, बीटीजी लीगल सर्व्हिस, बीटी बीएलसी, ट्‌विटर, फेसबुक.