..मग मी कुणालाही बाद करू शकतो : आश्‍विन

पीटीआय
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

मी आणि जडेजाने प्रत्येकी जवळपास 30 षटके गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्यांना 'फॉलो-ऑन' दिल्यानंतर पुन्हा इतकी गोलंदाजी करणे अवघड झाले असते. शिवाय, सामन्यात आणखी भरपूर वेळ शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच आहे

इंदूर: 'गोलंदाजीला सुरवात केली, की सूर गवसायला मला थोडा वेळ लागत आहे. पण एकदा सूर गवसला, की जगातील कुठल्याही फलंदाजास चकवू शकतो, असा विश्‍वास मला आहे,' अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्‍विन याने आज (सोमवार) व्यक्त केली.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या डावात आश्‍विनने सहा गडी बाद केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान 200 बळी मिळविणाऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत आश्‍विन दुसऱ्या स्थानी आहे. तसेच, भारतासाठी कसोटीमध्ये सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्‍विन आता आठव्या स्थानी आला आहे.

तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आश्‍विनने पत्रकार परिषदेत सांगितले, की गोलंदाजी करताना सूर गवसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, "न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेमध्ये मला सूर सापडायला थोडा वेळ लागत आहे. यात पहिली काही षटके जातात. एकदा सूर गवसला, की माझी गोलंदाजी अधिक भेदक होते. आज उपाहारानंतरच्या सत्रात असेच झाले.''

आश्‍विनने सहकारी गोलंदाजांचेही कौतुक केले. तो म्हणाला, "सहकारी गोलंदाजांचा पाठिंबाही महत्त्वाचा असतो. वेगवान गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी खडतर होती. पण तरीही महंमद शमी आणि उमेश यादवने जीव तोडून गोलंदाजी केली. त्यांनी न्यूझीलंडवरील दडपण कायम राखले.''

या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 557 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर न्यूझीलंडला 299 धावांत बाद करत पहिल्या डावात 258 धावांची मोठी आघाडीही घेतली. तरीही कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडला 'फॉलो-ऑन' न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्‍विनने या निर्णयाचे समर्थन केले. "मी आणि जडेजाने प्रत्येकी जवळपास 30 षटके गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्यांना 'फॉलो-ऑन' दिल्यानंतर पुन्हा इतकी गोलंदाजी करणे अवघड झाले असते. शिवाय, सामन्यात आणखी भरपूर वेळ शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच आहे,'' असे आश्‍विन म्हणाला.