अनुराग ठाकूरांवर कारवाईचा न्यायालयाचा इशारा

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

सकृतदर्शनी ठाकूर आणि चिटणीस अजय शिर्के या दोघांनी अवमान केल्याचे आम्हाला वाटते. आम्हाला कारवाई करणे भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींना बीसीसीआय विरोध करीत आहे.

नवी दिल्ली - न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाईचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या आरोपातून बचाव व्हावा असे वाटत असेल तर माफी मागावी, असेही बजावण्यात आले. दरम्यान, लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी निरीक्षकांचे पॅनेल नेमण्यासाठी नावे सुचवावीत, असे बीसीसीआयलाच सांगण्यात आले. न्यायालयाने आदेश मात्र राखून ठेवला, त्यामुळे हिवाळी सुटीनंतर दोन किंवा तीन जानेवारी रोजी आदेश देण्याची अपेक्षा आहे.

आजच्या सुनावणीत न्यायालयाने ठाकूर यांना धारेवर धरले. तुमचा इरादा काय आहे, असा सवाल विचारण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने एकदा आदेश दिल्यानंतर तुम्ही आयसीसीकडे जाता आणि त्यांना पत्र लिहायला सांगता. लोढा समितीच्या शिफारशी म्हणजे न्यायालयीन हस्तक्षेप असल्याचे लेखी मागता. तुम्ही न्यायालयाची दिशाभूल का करीत आहात, असाही प्रश्न विचारण्यात आला.

त्यानंतर न्यायालयाने इशारा दिला, की दिशाभूल केल्याच्या आरोपातून बचावायचे असेल तर माफी मागावी. प्रत्येक टप्प्यावर तुम्ही अडथळे आणत आहात. प्रत्येकालाच पदावर कायम राहायचे आहे, वयाची सत्तर वर्षे उलटल्यानंतरही पदाला चिकटून राहायचे आहे. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; पण याचा अर्थ तुम्ही अंमलबजावणीत अडथळा आणायचा असा होत नाही.

ठाकूर यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले, की आमचे अशील कोणत्याही मार्गाने न्यायालयात खोटे बोलणार नाहीत, तसे सिद्ध करणारी कागदपत्रे मी सादर करेन.

न्यायालयाने सांगितले, की सकृतदर्शनी ठाकूर आणि चिटणीस अजय शिर्के या दोघांनी अवमान केल्याचे आम्हाला वाटते. आम्हाला कारवाई करणे भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या लोढा समितीच्या शिफारशींना बीसीसीआय विरोध करीत आहे.

मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांऐवजी हे पॅनेल नेमण्याचा न्यायालयाचा विचार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांचे नाव त्यासाठी चर्चेत होते; पण बीसीसीआयने ते नाकारले. यानंतरही पिल्ले यांची नियुक्ती होऊ शकते. बिहार क्रिकेट संघटनेच्या याचिकाकर्त्यांनी माजी अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांचे नाव सुचविले आहे. वरिष्ठ वकील गोपाल सुब्रह्मण्यम हेसुद्धा पॅनेलवर येऊ शकतात. या प्रकरणात ते न्यायालयाचे मित्र म्हणून काम पाहात आहेत. निरीक्षकांना आयपीएलच्या प्रसारमाध्यम कराराबाबत निर्णयाचे अधिकार असतील.

या संदर्भात मंगळवारी सुनावणी झाली होती. त्या वेळी सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने बीसीसीआयची लोढा शिफारशींच्या आढाव्याची याचिका फेटाळली होती.

क्रीडा

मुंबई - जागतिक कुस्तीतील निर्णय अधिक अचूक होण्यासाठी मॅटभोवतालच्या कॅमेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. पॅरिसला आजपासून सुरू झालेल्या...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - स्वप्नील धोपाडेने एम. आर. ललित बाबूविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेतील प्रवेश निश्‍चित...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी पुन्हा एकदा एकाच गटात आले आहेत. भारतात...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017