विक्रमी जोडी

ज्ञानेश भुरे
सोमवार, 17 ऑक्टोबर 2016

या वेळी गुगळे आणि बावणे यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचा 624 धावांच्या भागीदारीचा विक्रमही शक्‍य होता; पण, रणजी स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी पहिल्या डावातील आघाडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डाव घोषित केल्यामुळे भागीदारीचा जागतिक विक्रम राहून गेला.

क्रिकेटच्या देशांतर्गत इतिहासात भलेही रणजी विजेतेपदापासून महाराष्ट्र दूर राहिली असेल; पण त्यांनी देशाला अनेक दर्जेदार क्रिकेटपटू दिले, हे नाकारून चालणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील विजय हजारे, भाऊसाहेब निंबाळकर, प्रा. दि. ब. देवधर, कमल भांडारकर त्यानंतर चंदू बोर्डे, हेमंत कानिटकर, मिलिंद गुंजाळ, राजू भालेकर, सुरेंद्र भावे, शंतनू सुगवेकर, केदार जाधव अशी किती तरी नावे घेता येतील; पण, ही परंपरा खंडित झाली, की काय, असे वाटत असतानाच यंदाच्या मोसमात चमकलेल्या एका जोडीने आशा उंचावल्या आहेत. अंकित बावणे आणि स्वप्नील गुगळे यांनी दुसऱ्याच सामन्यात वैयक्तिक सर्वोत्तम खेळीबरोबरच रणजी स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला.

बावणेची नाबाद 251 आणि गुगळेची नाबाद 351 धावांची खेळी नजरेत भरणारी आहे. मुख्य म्हणजे या वेळी सामने त्रयस्थ केंद्रावर होत असल्यामुळे त्यांच्या खेळी आणि भागीदारीला महत्त्व आहे. कारण आतापर्यंत महाराष्ट्राच्या फलंदाजांना केवळ नेहरू स्टेडिअमवर आणि आता गहुंजेतच खेळता येते, असे खोचकपणे म्हटले जायचे, त्याला परस्पर उत्तर मिळाले. या जोडीने दिल्लीविरुद्ध 594 धावांची नाबाद भागीदारी केली. तब्बल 70 वर्षांनी "रणजी‘तील भागीदारीचा विक्रम या जोडीने मोडला.

या वेळी गुगळे आणि बावणे यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचा 624 धावांच्या भागीदारीचा विक्रमही शक्‍य होता; पण, रणजी स्पर्धेचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी पहिल्या डावातील आघाडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डाव घोषित केल्यामुळे भागीदारीचा जागतिक विक्रम राहून गेला. केदार जाधव राष्ट्रीय संघात गेल्यामुळे गुगळेला तीन सामन्यांपुरती कर्णधाराची जबाबदारी मिळाली; पण, या जबाबदारीच्या ओझ्यातही त्याची खेळी महत्त्वाची ठरते. खेळपट्टीवर इतका वेळ टिकून उभे राहणे सोपे नसते.

गुगळे काय किंवा बावणे या दोघांच्या एकाग्रतेला दाद द्यायलाच हवी. बावणेला क्रिकेटच्या ऑफ सिझनमध्ये तमिळनाडू प्रिमिअर लीग खेळण्याचा फायदा झाला. गुगळेनेदेखील स्थानिक क्रिकेटच्या "टच‘मध्ये राहताना त्याला फुटबॉल खेळण्याची जोड दिली. एकूणच आजच्या क्रिकेटला आवश्‍यक असणारी तंदुरुस्ती दोघांनी राखली होती. त्यामुळेच मैदानावर प्रदीर्घ काळ टिकण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी ती दाखवून दिली. गुगळेने महाराष्ट्राचा चौथा त्रिशतकवीर होण्याचा मान मिळविला. त्यामुळे भाऊसाहेब निंबाळकर, विजय हजारे आणि केदार जाधव यांच्या पंक्तीत तो जाऊन बसला आहे.