रोहित शर्मा, महंमद शमीचे अपेक्षित पुनरागमन 

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्‍य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पंड्या, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रित बुमरा आणि मनीष पांडे.

नवी दिल्ली : चँपियन्स करंडक स्पर्धेत खेळण्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर सोमवारी अखेर विराट सेनेची फौज निवडण्यात आली. रोहित शर्मा आणि महंमद शमी यांची अपेक्षेनुसार निवड करण्यात आली असून, पाच राखीव खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये इंग्लंडमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघ यंदा इंग्लंडमध्येच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हेच विजेतेपद राखण्यासाठी खेळणार आहे. आयपीएल स्पर्धेत सध्या भरीव कामगिरी करत असल्यामुळे काही खेळाडूंची नावे चर्चेत आली होती, परंतु एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यश मिळवलेल्या संघावरच विश्‍वास कायम ठेवला आले. खांद्याला दुखापत झाल्यामुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेला के. एल. राहुल अद्याप तंदुरुस्त न झाल्यामुळे शिखर धवनचा पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. 

दोन वर्षांनंतर शमीचे पुनरागमन 
2015 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळल्यानंतर वेगवान गोलंदाज महंमद शमी गुडघा दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर होता. दोन वर्षांनंतर तो पुन्हा आयसीसीच्या जागतिक स्पर्धेत खेळणार आहे. आयपीएल स्पर्धेतून त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. 
सलामीवीर रोहित शर्मानेही पुनरागमन केले आहे. मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मांडीचा स्नायू दुखावलेला रोहित शर्मा चार महिने तरी क्रिकेटपासून दूर होता. आयपीएलमधूनच त्याने तंदुरुस्ती दाखवून दिली आहे. 

अश्‍विनची निवड चाचणीशिवाय 
दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेल्या प्रत्येक खेळाडूला पुनरागमन करण्यासाठी सामना तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल, असा नियम प्रशिक्षक अनिल कुंबळेने तयार केलेला आहे, परंतु अश्‍विनला कोणताही सामना खेळल्याशिवाय निवडण्यात आले. मायदेशातील मालिकेत भारतीय संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलणारा अश्‍विन सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलमधूनही त्याने माघार घेतलेली आहे. शमी, रोहित शर्मा यांनी आयपीएलमध्ये खेळून तंदुरुस्ती सिद्ध केली असली तरी अश्‍विनला अशा कोणत्याही परीक्षेशिवाय निवडण्यात आले आहे. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा असे दोनच फिरकी गोलंदाज संघात आहेत. 

पाच खेळाडू राखीव 
15 खेळाडूंच्या संघातून एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली तर, रिषभ पंत, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), सुरेश रैना (फलंदाज), कुलदीप यादव (फिरकी गोलंदाज), आणि शार्दुल ठाकूर (वेगवान गोलंदाज) यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर हे पाचही खेळाडू बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करतील. या दरम्यान त्यांच्या व्हिसाचीही तयारी केली जाईल.