गोलंदाजीतील वाईट सवय आता सोडली.. : उमेश यादव 

सुनंदन लेले
शुक्रवार, 17 मार्च 2017

रवींद्र जडेजा सातत्याने एका टप्प्यावर चेंडू टाकतो. खेळपट्टी जरा खराब झाली, की मग त्याचा चेंडू कधी वळतो, तर कधी झपकन सरळ येतो. याचमुळे जडेजाच्या गोलंदाजीवर सतत सावध राहावे लागते. 
- ग्लेन मॅक्‍सवेल, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज 

रांची : "एका षटकात चार चांगले चेंडू टाकल्यानंतर एक चेंडू मी फलंदाजाच्या पायावर टाकत होतो. ती वाईट सवय मी आता सोडली आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने आज (शुक्रवार) व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम असतानाही भारतीय गोलंदाजांनी आजच्या दोन सत्रात त्यांना रोखण्याची किमया केली. यासाठी यादवने सहकारी गोलंदाज रवींद्र जडेजाचेही कौतुक केले. 

या डावात जडेजाने पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. यादवला तीन विकेट्‌स मिळाल्या. यादव म्हणाला, "रांचीमधील खेळपट्टी फलंदाजीला अजूनही उत्तम आहे. ऑस्ट्रेलियाची वाढू पाहणारी धावसंख्या आम्ही 451 पर्यंत रोखली. यातील माझ्या योगदानाविषयी मी समाधानी आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या फलंदाजीचे तंत्र विचित्र आहे. तो कधी आत सरकतो, तर कधी खूप जास्त बाहेर जातो. गोलंदाजी करताना त्याच्या हालचालींकडे लक्ष देऊन मला शेवटच्या क्षणी बदल करावा लागत होता. रांचीच्या या मैदानावर धावा रोखणे कठीण आहे. मैदान मोठे असल्याने भरपूर मोकळ्या जागा असतात. त्यामुळे एकेरी धावा रोखणे अवघड होते. 'आऊटफिल्ड' वेगवान असल्याने चेंडू क्षेत्ररक्षकापासून लांब गेला, की थेट चौकारच मिळतो. अशा स्थितीत रवींद्र जडेजाने केलेल्या गोलंदाजीला दाद द्यावी लागेल. विकेट कशीही असो, तो टप्पा-दिशा पकडून गोलंदाजी करतो. या सातत्यामुळेच त्याला यश लाभते.'' 

ऑस्ट्रेलियाला गुंडाळल्यानंतर भारतीय सलामीवीरांनी चांगली फलंदाजी केली. चाळीस षटकांमध्ये भारताने एक गडी गमावून 120 धावा केल्या. याविषयी यादव म्हणाला, "फलंदाजीला उतरल्यानंतर भारताने 120 धावा करून हेच दाखवून दिले आहे, की खेळपट्टी अजूनही फलंदाजीसाठी उत्तम आहे. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आमचे फलंदाज भक्कम खेळतील, असा मला विश्‍वास आहे.'' 

या खेळीचे मोल वेगळे : मॅक्‍सवेल 
'धडाकेबाज फलंदाज' असा शिक्का बसलेल्या ग्लेन मॅक्‍सवेलला अद्याप कसोटी संघातील स्थान पक्के करता आलेले नाही. इतर खेळाडूंच्या दुखापतींमुळे या सामन्यात मॅक्‍सवेलला संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले.

मॅक्‍सवेल म्हणाला, "मला नेहमीच लाल चेंडूचे क्रिकेट खेळण्याची इच्छा होती. कसोटी क्रिकेट हाच सर्वांत खडतर परीक्षा घेणारा प्रकार आहे, हे माहीत होते. म्हणून मी 'बॅगी ग्रीन' कॅप डोक्‍यावर चढवून पांढऱ्या कपड्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी उतावीळ होतो. यानंतर पुन्हा संघात संधी मिळेल की नाही, याची मला खात्री नव्हती. त्यामुळे हीच संधी साधण्याचा माझा विचार होता. मी फलंदाजीला गेलो, तेव्हा संघाची अवस्था नाजूक होती. समोर स्टीव्ह स्मिथ सहज-सुंदर फलंदाजी करत होता. 'सरळ बॅटने खेळ' इतकाच सल्ला त्याने मला दिला. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर धावा काढणे मला शक्‍य झाले. काल मी 82 धावांवर नाबाद होतो. रात्रभर मला नीट झोपही लागली नाही. शेकडो विचार माझ्या मनात येत होते. या सगळ्यांचा विचार करता रांचीतील शतकाचे मोल वेगळे आहे.''