'अनप्लगड्‌ धोनी' धमाल करणार

सुनंदन लेले
गुरुवार, 6 एप्रिल 2017

संघातील वातावरण सकारात्मक असणे, एकमेकांच्या यशात आनंद घेणे तसेच अपयशाच्या काळात साथ देणे या फार मोलाच्या गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे मान्य करून समजून प्रत्येकाला हाताळण्याचा वेगळा मार्ग शोधावा लागतो. प्रत्येक व्यक्तीकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे त्याकरिता पोषक वातावरण निर्माण करणे हे कर्णधाराचे काम असते.

स्टीव्ह स्मिथने गेल्या दोन वर्षांत धावांचा पाऊस पाडला आहे. भारतीय संघाचा तर त्याने जणू बॅटने छळ केला; कारण दहा कसोटी सामन्यांत तब्बल आठ शतके ठोकली आहेत. चार कसोटी सामन्यांची मालिका संपत असताना स्मिथच्या खास मुलाखतीकरिता मी मागणी घातली होती. स्टीव्ह स्मिथ पुणे आयपीएल संघ रायझिंग पुणे सुपर जायंटस्‌चा कर्णधार झाल्याने वेळ मिळणे मोलाचे होते. आयपीएल स्पर्धेच्या तयारीकरिता खेळाडू पुण्यात आले आणि अचानक फोनवर स्टीव्ह स्मिथचा मेसेज आला, 'आज संध्याकाळी 5.30 वाजता येतोस का...गप्पा मारूयात'. तयारी करून मी मेरियट हॉटेलवर पोचलो आणि स्मिथ नुसता भेटला नाही तर त्याने खरच मनमोकळ्या गप्पा मारल्या. 

...............................................................................

प्रश्न: असा कोणता फॉर्म तू भरला होतास की इतक्‍या धावा सातत्याने करत आहेस? 
स्मिथ : (मोठ्यांदा हसत) आहे खरं माझा आत्ताचा फॉर्म चांगला. मला कल्पना आहे की क्रिकेटमध्ये गोष्टी पटकन बदलतात. नशिबाची साथ असावी लागते. आत्ता सगळे मनासारखे होत आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा प्रयत्न मी करतो आहे. जमत असते तेव्हा फलंदाजाने धावांच्या बाबतीत तृप्त व्हायचे नसते. मी अजून शिकतोय माझ्या खेळात सुधारणा करायला धडपडतोय. 

प्रश्न: तुझ्या फलंदाजीचे तंत्र वेगळे आणि खरे बोलायचे झाले तर काहीसे विचित्र आहे. पहिल्यापासून असेच नैसर्गिक आहे की कुणी बदलले? 
स्मिथ :
सध्या मी धावा करत असल्याने कोणी माझे तंत्र बदलायचा विचारही करत नाही. तुला सांगून आश्‍चर्य वाटेल, पण सुरवातीला मी कॉपी बुक फलंदाजी करायचा प्रयत्न करायचो. मग ट्रेंट वूडहील नावाच्या प्रशिक्षकाला भेटलो. तो एकच असा वेगळा प्रशिक्षक होता की, ज्याने मला सांगितले की, ऑफ स्टंप हा माझ्याकरिता लेगस्टंपसारखा आहे. मी तेव्हा 16 वर्षांचा होतो. त्याने मला सांगितले होते की, उजव्या स्टंपवरचा चेंडू मी कव्हर्समधून नाही, तर सरळ मारायचा आणि मधल्या स्टंपवरचाही चेंडू डाव्या बाजूलाच मारायचा. मान्य आहे की हे तंत्र अंगीकारायला सोपे नाही. पण माझ्याकरिता ते चौकटीत बसले आहे. क्रिकेटच्या कोणत्याही पातळीवर प्रशिक्षक गोलंदाजाला उजव्या स्टंपची दिशा पकडून मारा करायला सांगतो. माझ्या तंत्राला तोच प्रकार पोषक ठरतो. जरा गंमतशीर आहे हे सगळे, पण सत्य आहे. पुढे जाऊन मी असे म्हणेन की आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रापेक्षा मनोबल आणि इच्छाशक्ती या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. कोणत्याही खेळाडूला भरारी मारायची असेल, तर त्याची सातत्याने बरोबर निर्णय क्षमता चांगली असावी लागते. फलंदाजाला यश मिळवायचे असेल तर अहंकार बाजूला ठेवून कधी कधी खेळावे लागते...तग धरावा लागतो. म्हणूनच तंत्राबरोबर मनोबल, निर्णयक्षमता आणि शरीर-मनातील समन्वय या गोष्टी जास्त निर्णायक ठरतात. 

प्रश्न:  चांगला कर्णधार बनायला गुणवत्तेची पारख असणे किती गरजेचे आणि मॅन मॅनेजमेंट किती महत्त्वाचे? 
स्मिथ :
दोन्ही बाबींचा समन्वय असायला हवा. मला नेहमी मैदानावर उतरल्यावर संघाला हाताळणे सोपे वाटते. पण तो नेतृत्वाचा एक भाग आहे. दुसरा भाग मैदानाबाहेरच्या हाताळणीचा आहे. संघातील वातावरण सकारात्मक असणे, एकमेकांच्या यशात आनंद घेणे तसेच अपयशाच्या काळात साथ देणे या फार मोलाच्या गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे मान्य करून समजून प्रत्येकाला हाताळण्याचा वेगळा मार्ग शोधावा लागतो. प्रत्येक व्यक्तीकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे त्याकरिता पोषक वातावरण निर्माण करणे हे कर्णधाराचे काम असते. सकारात्मक टीका कोणावर आणि कधी करायची याचा अंदाज सतत घ्यावा लागतो. कधी नुसती जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते. तुमच्या संघात जर नेतृत्व गुण असलेले अजूनही काही खेळाडू असतील तर कर्णधाराला फार मोठी मदत होते. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल स्टार्क असे खेळाडू आहेत जे संघातील तरुणांना बरोबर मार्गदर्शन करू शकतात. गरज असताना टीका करू शकतात तसेच प्रोत्साहनही देऊ शकतात. अशा वेळी कर्णधार म्हणून माझा भार किंचित हलका होतो. 

प्रश्न:  तुझ्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करता योग्य वागणूक ठेवत संघाला आदर्श घालून देणे हा सर्वांत चांगला आणि सोपा मार्ग वाटतो ना? 
स्मिथ :
अगदी बरोबर...चांगल्या वागणुकीने आदर्श घालून देणे हाच कर्णधारासाठी राजमार्ग आहे. माझ्याकरिता हा राजमार्ग नैसर्गिक आहे. मी जात्याच अत्यंत काळजी घेणारा माणूस आहे. माझ्यासोबतच्या सगळ्या माणसांचे भले व्हायला पाहिजे, असा माझा आग्रह असतो. संघाला अपयश आले तर मी दु:खी होतो. संघ कोणताही असो माझे सहकारी हे सर्वस्व असतात माझ्याकरिता. ते यशस्वी झाले संघ विजय मिळवत राहिला तर मला सर्वांत जास्त समाधान लाभते. 

प्रश्न: बोलाचाली आणि बाचाबाचीमध्ये काय फरक आहे? 
स्मिथ :
असे बघ की मैदानावर कुणीच काही बोलले नाही, तर खेळायलाही मजा येणार नाही. मैदानावरील वातावरणात जिवंतपणा बोलण्यानेच येतो. तेव्हा दोन तुल्यबळ संघांत सामना चालू असताना जरा बोलाचाली होणे यात मला काही गैर वाटत नाही. पण जेव्हा त्याची दिशा बदलून समोरच्या खेळाडूवर किंवा समोरच्या खेळाडूकडून वैयक्तिक टीका व्हायला लागते, तेव्हा पातळी घसरू लागते आणि क्रिकेटच्या संस्कृतीला धक्का लागू लागतो. कसोटी सामन्यात आम्ही खूप जास्त वेळ मैदानावर असतो. अशा वेळी थोडी बोलाचाली गरजेची असते, ते मजेदार असते. मैदानावर कोणीही त्याची पातळी बदलून बोलाचालीचे रूपांतर बाचाबाचीत व्हायला लागले की मग चुका व्हायला लागतात, ज्याला मला पटत नाहीत...रुचत नाहीत. 

प्रश्न: आयपीएलचे खेळाडूला आणि खेळाला फायदे काय? 
स्मिथ :
आयपीएल कमाल स्पर्धा आहे. विविध देशांचे खेळाडू एका संघातून एकदिलाने खेळतात हीच खरी मौज वाटते मला. विविध संस्कृती बघायला अनुभवायला मिळतात. क्रिकेटच्या खेळावर खरे प्रेम करणाऱ्या भारतात आयपीएल खेळायला मिळणे हे भाग्य समजतो मी. सामने तर रंगतदार होतातच, पण भारतातील विविध मैदानांवर वेगवेगळ्या विकेटस्‌वर सराव करून आपले कौशल्य वाढविणे हा फार मोठा अनुभव असतो. मला फलंदाजी सुधारण्याकरिता या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला आहे. 

प्रश्न:  स्टीव्ह स्मिथकरिता पैसा काय आहे? 
स्मिथ :
खोटे कशाला बोलू...पैसा महत्त्वाचा असतो, तो जवळ असणेही सुखकारक असते. पण खरे सांगतो तुला मी क्रिकेट कधीच पैशाकरिता खेळलो नाही. माझे क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. मला लढत देणे आवडते... स्वत:च्या क्षमतेला आव्हान देणे आवडते. चांगला खेळ करून संघाकरिता सामना जिंकून देणे यासारखी माझ्याकरिता दुसरी नशा नाही, आनंद नाही, समाधान नाही. 

प्रश्न: महेंद्रसिंह धोनी आणि अजिंक्‍य रहाणेबरोबर खेळण्याची मजा वेगळी असणार ना? 
स्मिथ :
मला धोनीबद्दल खूप आदर आहे. कमाल खेळाडू आणि चांगला यशस्वी कर्णधार राहिला आहे. गेल्या वर्षी मला त्याच्या हाताखाली खेळायची संधी मिळाली, ज्यातून मी खूप काही शिकलो. अजिंक्‍यपण मला खेळाडू म्हणून खूप आवडतो. एक वेगळाच क्‍लास आहे त्याला. अशा खेळाडूंची मैदानावरची आणि मैदानाबाहेरची वागणूक तयारी कशी असते याचा अभ्यास करायला मजा येते. मला अगदी मनापासून वाटते की या आयपीएल मोसमात अनप्लगड्‌ धोनी धमाल करणार. मस्त सामने खेळून तो योग्यवेळी भरात येत आहे. तो जगातील सर्वोत्तम फिनिशर समजला जातो ते उगाच नाही. जर धोनीला सूर गवसला, तर रायझिंग पुणे सुपर जायंटस्‌ संघ या वेळी चांगला पल्ला गाठेल, असा मला विश्‍वास वाटतो. 

प्रश्न:  रायझिंग पुणे सुपर जायंटस्‌ संघात काही नवे खेळाडू दाखल झाले आहेत. 
स्मिथ :
अर्थातच बेन स्टोक्‍स्‌ आमच्या संघात आलाय. फार कमाल खेळाडू आहे तो. त्याच्या फटक्‍यात आणि गोलंदाजीत खरी ताकद आहे. तसेच मला अजून एका खेळाडूचे नाव घ्यावेसे वाटते आणि तो म्हणजे राहुल त्रिपाठी. आहा...राहुल त्रिपाठी पुण्याचा खेळाडू आहे नाही का? फार मस्त गुणवत्ता आहे त्याच्यात. वेगळीच चमक आहे त्याच्या फटकेबाजीत. तो 11 जणांच्या संघात दिसला तर आश्‍चर्य वाटून घेऊ नकोस. फक्त एकच सांगतो दिसतो तेवढा टी-20 क्रिकेट प्रकार सोपा नाही. एका षटकात धावा कमी दिल्या तर गोलंदाजी करणारा संघ अचानक वर्चस्व गाजवताना दिसतो. दुसऱ्या बाजूला एका षटकात कोणी फलंदाजाने षटकार, चौकार ठोकत 20 धावा ठोकल्या तर गडबड होते. कर्णधार म्हणून फार जागरूक राहावे लागते. मला धोनीचा म्हणूनच आधार वाटतो. 

प्रश्न: स्टीव्ह इतक्‍या जबाबदाऱ्या तुझ्या खांद्यावर आहेत. यातून मन शांत करायला तू काय छंद जोपासतोस? 
स्मिथ :
सिनेमा बघायला मला आवडते. सध्या मला ड्रोन उडवायचा आणि त्याचा वापर करून फोटो आणि छोट्या क्‍लीप्स करायचा छंद लागलाय. इथे आल्यावर समजले की भारतात द्रोण चालवण्यावर बरेच निर्बंध आहेत, त्यामुळे मी माझे छोटे ड्रोन सध्या वापरत नाहीये. घरी गेल्यावर मी मोठे ड्रोन घेणार असून घराचे शूटिंग करणार आहे. 

प्रश्न: 2017 आयपीएल मोसमाकडून काय अपेक्षा करतो आहेस? 
स्मिथ : अपेक्षा नक्कीच चांगल्या आहेत, कारण आमचा संघ बलवान आणि परिपूर्ण आहे. मान्य आहे की अश्‍विनसारखा दादा गोलंदाज संघात दुखापतीमुळे नसणार, तरीही संघ चांगला आहे. सुरवात चांगली होण्याकडे माझे लक्ष असेल. एकदा का चांगली लय सापडली की मग आम्हाला रोखणे कठीण जाईल, अशी फायर पॉवर आमच्याकडे आहे. मला आशा आहे की पुणेकर क्रिकेटप्रेमी संघाला भरपूर प्रोत्साहन देतील आणि आम्ही चांगला खेळ करून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू.

 

सुनंदन लेले

Web Title: Unplugged Dhoni will do wonders in IPL 10 says Pune skipper Steve Smith