तमिळनाडूला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नवी दिल्ली - दिनेश कार्तिकचे शानदार शतक आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर तमिळनाडूने बंगालचा ९१ धावांनी पराभव करून विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

नवी दिल्ली - दिनेश कार्तिकचे शानदार शतक आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर तमिळनाडूने बंगालचा ९१ धावांनी पराभव करून विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

फिरोजशा कोटला मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या या सामन्यात दोन्ही संघ प्रत्येकी ५० षटके खेळू शकले नाहीत. दिनेश कार्तिकने १४ चौकारांसह ११२ धावा केल्या असल्या, तरी तमिळनाडूचा डाव ४७.२ षटकांत २१७ धावांत संपुष्टात आला. फटकेबाजीस अनुकूल असलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील हे किरकोळ आव्हानही बंगालला पेलवले नाही. त्यांचा डाव ४५.५ षटकांत अवघ्या १८० धावांत आटोपला. दोन्ही संघांकडून वेगवान गोलंदाजांनी चमक दाखवली. बंगालकडून महंमद शमीने चार; अशोक दिंडाने तीन बळी मिळवले; तर तमिळनाडूच्या अश्‍विन क्रिस्ट, एम. महंमद या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.

नाणेफेक जिंकून तमिळनाडूने प्रथम फलंदाजी स्वीकारली, परंतु, शमी आणि दिंडा यांच्यासमोर एकवेळ त्यांची अवस्था ४ बाद ४९ अशी दयनीय झाली होती. त्यानंतर दिनेश कार्तिकने एक बाजू लढवली. त्याला बाबा इंद्रजित, वॉशिंग्टन सुंदर यांनी साथ दिली. 

उपांत्य सामन्यात झारखंडविरुद्ध शतक करणाऱ्या श्रीवत्स गोस्वामी आणि अभिमन्यू ईश्‍वरन यांच्याकडून बंगालला मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्यांची ४ बाद ६८ अशी घसरगुंडी उडाली. सुदीप चॅटर्जी आणि अनुस्तुप मजमुदार यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

संक्षिप्त धावफलक : तमिळनाडू ः ४७.२ षटकांत सर्व बाद २१७ (दिनेश कार्तिक ११२- १२० चेंडू, १४ चौकार, बाबा इंद्रजित ३२, वॉशिंग्टन सुंदर २२, अशोक दिंडा ३-३६, महंमद शमी ४-२६) वि. वि. बंगाल ः ४५.५ षटकांत सर्व बाद १८० (मनोज तिवारी ३२, सुदीप चॅटर्जी ५८, अनुस्तुप मजमुदार २४, आमीर गमी २४, अश्‍विन क्रिस्ट २-२३, एम. महंमद २-३०, राहिल शहा २-३८)

Web Title: vijay hazare trophy win tamilnadu