शैलीचे शंकेखोर आहेतच; पण माझा क्षमतेवर विश्‍वास - विराट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

बंगळूर - 'मी ज्या शैलीने क्रिकेट खेळतो, त्याविषयी संपूर्ण कारकिर्दीत अनेकांना शंका वाटत आली. आजसुद्धा सर्वत्र शंकेखोर आणि टीकाकार आहेत; पण एक गोष्ट पक्की होती आणि ती म्हणजे माझा स्वतःच्या क्षमतेवर नेहमीच विश्‍वास वाटत आला आहे,' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा जिगरबाज कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली.

विराटला "बीसीसीआय'च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा "पॉली उम्रीगर पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्या वेळी त्याने भावपूर्ण भाषण केले. तो म्हणाला की, "मला लहानपणापासूनच जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू बनायचे होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी करण्याची गरज असल्याची मला फार चांगली जाणीव आहे. स्थित्यंतराचा टप्पा सुरू असल्यामुळे आणि भारतीय संघाला पुढे नेण्यासाठी तिन्ही प्रकारांसाठी उपलब्ध असणे फार महत्त्वाचे आहे.'

हा पुरस्कार तीन वेळा पटकावलेला विराट हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. कसोटी क्रिकेटमधील भरारीचे श्रेय त्याने संघातील सहकाऱ्यांना दिले. तो म्हणाला की, "मागील 12 महिने माझ्या कारकिर्दीसाठी निर्णायक ठरले. संघातील खेळाडूंनी दिलेला पाठिंबा आणि कामगिरीतील योगदान कौतुकास्पद आहे. हा कालावधी अनोखा ठरला आहे. क्रिकेटपटू म्हणून प्रत्येकासाठी एक वर्ष निर्णायक ठरते. कसून केलेला सराव, रोज घेतलेली मेहनत, त्यात अशा सर्वांचे फळ मिळाले. माझ्या सहकाऱ्यांशिवाय हे यश साकार होऊ शकले नसते. काही वेळा तुमचा खेळ चांगला होत नाही, पण संघात चॅंपियन खेळाडू असतील तर ते पुढाकार घेतात. प्रत्येक जण आपला वाटा उचलतो. त्यानंतरच तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतात.'

जीवनातील प्रत्येक दिवशी 120 टक्के सराव केल्यास कुणालाही उत्तर देण्याची गरज उरणार नाही, असा विश्‍वास मला मनोमन वाटायचा
- विराट कोहली