पहिल्या दिवस भारतीय फलंदाजांचा!

सुनंदन लेले
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

भारतीय संघात दोऩ बदल करण्यात आले असून, गंभीरच्या जागी के. एल. राहुलची आणि अमित मिश्राऐवजी जयंत यादवला संघात स्थान देण्यात आले आहे.

विशाखापट्टणम : सलग दुसरे शतक झळकावणारा चेतेश्‍वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकीसाथीने बहरलेल्या त्यांच्या भागीदारीने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडविरुद्ध पहिल्या दिवशी भारताची स्थिती भक्कम केली.

कोरड्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर गुरुवारी पहिल्या दिवसाच्या खेळावर भारतीय फलंदाजांनी मोहोर उमटवली. भारताने पहिल्या दिवसअखेरीस 4 बाद 317 धावा केल्या होत्या. त्या वेळी विराट कोहली 151 आणि अश्‍विन 1 धाव काढून नाबाद होता.

तातडीने संघात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलला दुसऱ्याच षटकांत स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. त्यानंतर सरळ बॅटने खेळणाऱ्या मुरली विजयला अँडरसनच्या उसळत्या चेंडूचा अंदाज आला नाही. तासाभरात सलामीची जोडी तंबूत परतल्यावर एकत्र आलेल्या चेतेश्‍वर पुजारा आणि विराट कोहली यांनी झकास फलंदाजी केली. त्यांची वैयक्तिक शतकी खेळी आणि द्विशतकी भागीदारी यामुळे भारतीय फलंदाजांनी या वेळी इंग्लंडच्या गोलंदाजांवर हुकमत राखली. भारताने आज खेळपट्टीच्या लक्षणाचा अंदाज घेत अमित मिश्राला वगळून जयंत यादवला पदार्पणाची संधी दिली. इंग्लंडने ख्रिस वोक्‍सला वगळून जेम्स अँडरसनची अपेक्षित निवड केली.

सलामीच्या फलंदाजांना बाद केल्यावर इंग्लंडचे गोलंदाज लय पकडतील असे वाटत होते; पण, पुजारा आणि कोहली यांनी सामंजस्याने फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना तेथेच थोपवून धरले. चेंडू नवा असे पर्यंत ब्रॉड, अँडरसन, स्टोक्‍स यांच्या गोलंदाजीत काही तरी दम दिसत होता. चेंडू जुना झाला, तसा खेळपट्टीमधील ताजेपणाही संपला. स्वच्छ सूर्यप्रकाशात खेळपट्टी अधिक कोरडी होऊ लागली. तसे पुजारा आणि कोहली यांनी वर्चस्व राखण्यास सुरवात केली. आदिल रशीद, जाफर अन्सारी आणि मोईन अली या फिरकी गोलंदाजांनी नेटाने गोलंदाजी केली. पण, पहिल्या दिवशी खेळपट्टी कोहली-पुजारावर भाळली होती. उपाहारापर्यंत पुजारा-कोहली यांनी सावध फलंदाजी केली.

दुसऱ्या सत्रात खेळ सुरू झाल्यावर पुजारा-कोहली दोघांनी फटकेबाजीस सुरवात केली. या दरम्यान पुजारा दोनदा धावबाद होता होता वाचला, तर कोहलीचा एक कठीण झेल सुटला. या तीन घटना वगळता इंग्लंड गोलंदाजांना काहीच करता आले नाही. या दुसऱ्या सत्रात शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कोहली, पुजारा यांनी अखेरच्या सत्रात शतकी मजल मारली. इंग्लंडकडून अँडरसनच उठून दिसला. त्याने पुजाराला (119) बाद करून इंग्लंडला तिसरे यश मिळवून दिले. खेळपट्टीचे स्वरूप बघता कुकने उशिराने नवा चेंडू घेतला. त्याचा त्याला फायदा झाला. दोन षटकांचा खेळ बाकी असताना अँडरसनने राहणेची विकेट मिळविली. आता दुसऱ्या दिवशी कोहलीला सहकाऱ्यांची किती साथ लाभते, यावर भारताची धावसंख्या अवलंबून असेल.

धावफलक 
भारत : पहिला डाव 
मुरली विजय झे. स्टोक्‍स गो. अँडरसन 20, लोकेश राहुल झे. स्टोक्‍स गो. ब्रॉड 0, चेतेश्‍वर पुजारा झे. बेअरस्टॉ गो. अँडरसन 119 (204 चेंडू, 12 चौकार, 2 षटकार), विराट कोहली खेळत आहे 151 (241 चेंडू, 15 चौकार), अजिंक्‍य रहाणे झे. बेअरस्टॉ गो. अँडरसन 23, आर. अश्‍विन खेळत आहे 1, अवांतर 3, एकूण 90 षटकांत 4 बाद 317 

बाद क्रम : 1-6, 2-22, 3-248, 4-316 
गोलंदाजी : जेम्स अँडरसन 16-3-44-3, स्टुअर्ट ब्रॉड 12-2-39-1, बेन स्टोक्‍स 13-3-52-0, झफर अन्सारी 12-145-0, आदिल रशिद 26-1-85-0, मोईन अली 11-0-50-0