'डीआरएस'चा वाद सोडा; क्रिकेटवर लक्ष द्या! : कोहली 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

एखादी खेळपट्टी पाहून त्याचे नेमके स्वरूप कसे असेल, असे ठामपणे सांगू शकणारा क्रिकेटपटू माझ्या पाहण्यात नाही. खेळपट्टीवर चेंडू किती स्विंग होईल किंवा फिरकी गोलंदाजांना किती मदत मिळेल, याचे भाकीत करणे अवघड असते. हवामान, खेळपट्टीचे स्वरूप, चेंडूची स्थिती वगैरे अनेक घटक असतात. 
- विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार 

रांची : 'बंगळूर कसोटीदरम्यान निर्माण झालेला वाद तिथेच संपला आहे. आता आमचे लक्ष पुढील सामन्यावर आहे. त्याच मुद्यावरून वाद घालत बसणे अनावश्‍यक आहे,' असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज (बुधवार) व्यक्त केले. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रांचीमध्ये उद्यापासून (गुरुवार) तिसऱ्या कसोटी सामन्यास सुरवात होत आहे. 

बंगळूर कसोटीमध्ये पंचांनी बाद दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने ड्रेसिंग रूममधून 'डीआरएस'विषयी संकेत घेण्याचा प्रयत्न केला होता. मैदानावरील पंच आणि भारतीय खेळाडूंनी या कृतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर पंचांनी स्टीव्ह स्मिथला मैदान सोडण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी सामना संपल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलिया आणि स्मिथवर फसवणुकीचा आरोप केला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने एकमेकांवरील आरोप आणि टीका मागे घेत क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले. 

या पार्श्‍वभूमीवर सामन्याच्या पूर्वसंध्येस झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला, "बंगळूर कसोटीतील त्या घटनेसंदर्भात बरेच काही लिहिले आणि बोलले गेले आहे. आता उर्वरित सामन्यांवर पुन्हा लक्ष केंद्रीत झाले पाहिजे, असे मला वाटते. बंगळूरमध्ये जे काही झाले, ते तिथेच संपले आहे. आम्ही आता रांचीमध्ये आहोत आणि आमचे पूर्ण लक्ष पुढील सामन्यावरच आहे. अर्थात, बंगळूर कसोटीनंतर मी जे काही वक्तव्य केले होते, त्याचा मला पश्‍चाताप होत आहे, असे नाही. पण त्याच गोष्टीवर सतत चर्चा करणेही मूर्खपणाचे आहे. या दोन सामन्यांमध्ये पुरेसा अवधी होता. त्यामुळे या कालावधीमध्ये क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा त्याच वादावर चर्चा करणे अनावश्‍यक आहे.'' 

Both teams have moved on from Bangalore. The focus should be back on the series. Priority is cricket: India captain @imVkohli #INDvAUS pic.twitter.com/ahHlZkEard

— BCCI (@BCCI) March 15, 2017

बंगळूर कसोटीमध्ये संघ अडचणीत असताना दुसऱ्या डावात के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी फलंदाजीच्या तंत्रात किंचित बदल करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना समर्थपणे तोंड दिले. याचे कोहलीने कौतुक केले. "पुजाराने त्याच्या फलंदाजीच्या शैलीत थोडा बदल केला. रहाणेनेही 'कव्हर्स'मधून फटका मारण्यावर नियंत्रण राखले. या गोष्टी बाहेरून दिसताना छोट्या वाटतात; पण यामुळे फलंदाजीत किती फरक पडला, हे निकालावरून दिसतच आहे,'' असे कोहली म्हणाला. 

एखादी खेळपट्टी पाहून त्याचे नेमके स्वरूप कसे असेल, असे ठामपणे सांगू शकणारा क्रिकेटपटू माझ्या पाहण्यात नाही. खेळपट्टीवर चेंडू किती स्विंग होईल किंवा फिरकी गोलंदाजांना किती मदत मिळेल, याचे भाकीत करणे अवघड असते. हवामान, खेळपट्टीचे स्वरूप, चेंडूची स्थिती वगैरे अनेक घटक असतात. 
- विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार 

Web Title: Virat Kohli India versus Australia Steve Smith DRS Ranchi test