कोहली ड्रेसिंग रूममध्ये; भारतीय संघ मैदानात!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

खेळ सुरू होण्यापूर्वी कोहलीने सराव सत्रात भाग घेतला होता. त्यावेळी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्याशी कोहलीने चर्चाही केली. मात्र, दिवसातील पहिल्या सत्रात तो मैदानावर उतरला नाही.

रांची : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला कर्णधार विराट कोहलीशिवायच मैदानात उतरावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे संघाचे नेतृत्व करत आहे. 

या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना कोहलीला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 40 व्या षटकात पीटर हॅंड्‌सकोम्बने फटकाविलेला चेंडू सीमेजवळ रोखताना कोहलीचा खांदा दुखावला होता. त्यानंतर लगेचच कोहली मैदानाबाहेर गेला. कोहलीवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकृत पत्रकानुसार, कोहलीची दुखापत गंभीर नाही आणि तो उर्वरित सामन्यात सहभागी होऊ शकणार आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आज (शुक्रवार) सकाळी खेळ सुरू होण्यापूर्वी कोहलीने सराव सत्रात भाग घेतला होता. त्यावेळी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि निवड समितीचे सदस्य देवांग गांधी यांच्याशी कोहलीने चर्चाही केली. मात्र, दिवसातील पहिल्या सत्रात तो मैदानावर उतरला नाही. 

मैदानावर झालेल्या दुखापतीमुळे कोहली क्षेत्ररक्षण करत नसल्याने त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकावर त्याचा परिणाम होणार नाही. बाह्य दुखापत असल्याने तो नेहमीच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, एखादा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना सलग आठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मैदानाबाहेर असेल, तर त्या सामन्यातील पुढील डावातील त्याच्या फलंदाजीच्या क्रमांकावर निर्बंध येतात. जितका वेळ खेळाडू क्षेत्ररक्षण करताना मैदानाबाहेर असेल, तितका वेळ दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीसाठी मैदानात उतरता येत नाही. तसेच, त्याच्या संघाचे पाच गडी बाद झाले असतील, तरच तो खेळाडू त्या वेळेआधीच फलंदाजीसाठी येऊ शकतो. मात्र, क्षेत्ररक्षण करताना झालेल्या बाह्य दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्यास त्या खेळाडूला हा नियम लागू होत नाही.