धोनीलाच का लक्ष्य करता?: विराट कोहली

वृत्तसंस्था
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मला कळत नाही की लोक सतत धोनीलाच का लक्ष्य करतात. मी तीनवेळा फलंदाज म्हणून कामगिरी करू शकलो नाही, तर लोक माझ्यावर टीका करत नाही. कारण, मी 35 वर्षांपेक्षा मोठा नाही. धोनी हा तंदुरुस्त खेळाडू असून, त्याने सर्व चाचण्या पास केल्या आहेत. क्षेत्ररक्षणात त्याचा वाटा खूप मोठा आहे.

तिरुअनंतपुरम - न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात संथ फलंदाजीमुळे टीकाकारांचे लक्ष्य बनलेल्या महेंद्रसिंह धोनीची कर्णधार विराट कोहलीने पाठराखण केली असून, सतत धोनीलाच का लक्ष्य केले जाते असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

न्यूझीलंडविरुद्धची ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळविला आहे. राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. धोनीने या सामन्यात संथ फलंदाजी केल्याने त्याच्यावर पराभवाचे खापर फोडण्यात आले होते. त्याच्यावर टीका होत असताना विराट कोहली त्याच्या बचावात उतरला आहे.

विराट म्हणाला, की मला कळत नाही की लोक सतत धोनीलाच का लक्ष्य करतात. मी तीनवेळा फलंदाज म्हणून कामगिरी करू शकलो नाही, तर लोक माझ्यावर टीका करत नाही. कारण, मी 35 वर्षांपेक्षा मोठा नाही. धोनी हा तंदुरुस्त खेळाडू असून, त्याने सर्व चाचण्या पास केल्या आहेत. क्षेत्ररक्षणात त्याचा वाटा खूप मोठा आहे. फलंदाजीच्या बाबतीत म्हणायचे झाले, तर तो श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगला खेळला होता. या मालिकेत त्याला फलंदाजीची जास्त संधी मिळाली नाही. तो फलंदाजीला येणाऱ्या क्रमाचा आपण विचार केला पाहिजे. हार्दिकही या मालिकेत धावा करू शकला नाही, तुम्ही त्याला लक्ष्य केलेले नाही. त्यामुळे धोनीला सतत लक्ष्य करणे हे चुकीचे आहे.