मोजकेच ऑस्ट्रेलियन माझे मित्र - कोहली

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

मी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत तसे बोललो नव्हतो. काही मोजक्या खेळाडूंबद्दल माझे मत व्यक्त केले होते. ज्या खेळाडूंना मी ओळखतो, त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत आणि भविष्यातही राहतील.

नवी दिल्ली - चौथ्या कसोटी सामन्यानंतर पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिले आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबर असलेले मित्रत्वाचे नाते संपुष्टात आल्याच्या कोहलीच्या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियन माध्यमांकडून तसेच माजी क्रिकेटपटूंकडून टीकेची झोड उठविण्यात आली आहे. कर्णधार कोहलीचे वर्तन हे अशोभनीय आणि बालिश असल्याचे मथळे ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिले आहेत. ऑस्ट्रेलियातील "टेलिग्राफ'ने कोहलीला घमेंडी ठरवले आहे. मालिका संपल्यावर झाले गेले विसरून कोहलीने विषय संपवायला हवा होता; पण तो लहानमुलासारखाच वागत आहे, असे त्यांनी लिहिले आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लीमन यांनी कोहलीच्या वक्तव्यावर निराशा व्यक्त करत कर्णधाराने असे बोलणे उचित नाही, असे म्हटले होते.

याविषयी आज (गुरुवार) कोहलीने ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे. कोहली म्हणाला, की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत तसे बोललो नव्हतो. काही मोजक्या खेळाडूंबद्दल माझे मत व्यक्त केले होते. ज्या खेळाडूंना मी ओळखतो, त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत आणि भविष्यातही राहतील. याबरोबरच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळत असलेल्या खेळाडूंबरोबरील संबंधांतही काही बदल होणार नाही.

Web Title: Virat kohli says friendship comment was 'blown out of proportion