चेंडूचा टणकपणा राहिला नाही - कोहली

पीटीआय
मंगळवार, 21 मार्च 2017

रांची - खेळपट्टीने अखेरपर्यंत फलंदाजीचे लाड पुरवल्यानंतर तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खेळपट्टीचे स्वरूप हाच मुद्दा समोर आला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील अखेरच्या दिवशी गोलंदाजांना अपेक्षित असलेली मदत खेळपट्टीकडून मिळाली नसल्याचे मान्य केले. पण, त्याच वेळी त्याने मालिकेत वापरण्यात येणाऱ्या एसजी चेंडूंच्या दर्जाचा मुद्दा उपस्थित केला. चेंडूचा टणकपणा टिकून राहिला नाही, असे मत त्याने मांडले.

चेंडूचा मुद्दा ठळकपणे मांडताना कोहली म्हणाला, ‘‘पहिल्या दिवशी काही षटकांचा खेळ झाल्यावर चेंडूचा टणकपणा एकदम कमी झाला. त्यामुळे गोलंदाजांना विकेटवरून चेंडू झपकन काढणे शक्‍य झाले नाही. खेळपट्टीबरोबर हा मुद्दादेखील सामना अनिर्णित राहण्यास कारणीभूत ठरतो.’’ कोहलीने एकूण सामन्याबाबत बोलताना चेतेश्‍वर पुजाराच्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने साडेचारशे धावांची मजल मारली. आमचे सहा फलंदाजही त्यांनी बाद केले. पण, त्या वेळी पुजाराने साहाला साथीला घेत केलेली भागीदारी कमाल होती. पुजारा आमच्या संघातील हिरो आहे. त्याच्या कामगिरीचे योग्य ते कौतुक होत नाही. त्याची खेळी अवर्णनीय होती. त्या भागीदारीनेच सामन्याचे चित्र पालटले. ऑस्ट्रेलियावर या भागीदारीमुळेच दडपण आले आणि त्यांना सामना वाचवण्यासाठी धडपड करावी लागली.’’ संपूर्ण सामन्यात रवींद्र जडेजाने अफलातून गोलंदाजी केली. तसेच, सामन्यावर आमचेच वर्चस्व राहिले. आता धरमशाला येथेच असाच सर्वांगीण खेळ करून मोसमाची विजयी सांगता करायचा मनोदयदेखील कोहलीने व्यक्त केला.

लय आमच्याकडे आली :  स्मिथ
अखेरचा दिवस खेळून काढणे ऑस्ट्रेलियाला कठीण आहे, असाच अंदाज सर्वांनी व्यक्त केला. भारत ही कसोटीदेखील जिंकणार असेच म्हटले जाऊ लागले. दडपणाखाली आमच्या फलंदाजांनी सुरेख बचावात्मक फलंदाजी केली. सामना अनिर्णित राखण्याचे श्रेय फलंदाजांना द्यायलाच हवे. यामुळे आता मालिकेतील लय कायम राहिली असून, ती आमच्याकडे आली, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने व्यक्त केले. 

खेळपट्टीबाबत बोलताना स्मिथ म्हणाला, ‘‘रांचीची विकेट अपेक्षापेक्षा खूप चांगली टिकली. पहिल्या डावात आम्हाला ७५ धावा कमी पडल्या असे वाटते. पुजारा आणि साहा यांच्या भागीदारीमुळे सामना आमच्यापासून दूर गेला. दोघांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांच्या संयमाला दाद द्यायलाच हवी. खरे सांगायचे, तर आमच्यापैकी कुणीच यापूर्वी २०० षटके क्षेत्ररक्षण केले नव्हते. शॉन मार्श आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब यांनाही शाबासकी द्यायला हवी. त्यांच्यामुळेच आम्ही सामना बरोबरीत सोडवू शकलो.

Web Title: virat kohli statement