कोहली याचा दावा निखालस खोटा: स्मिथ

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

आम्ही असे सातत्याने करतो, हा दावा निखालस खोटा आहे. कोहली याचे यासंदर्भातील विधान चुकीचे आहे

रांची - भारत व ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने डीआरएस व्यवस्थेसंदर्भातील कौल घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे सूचक पद्धतीने पाहिल्यासंदर्भातील प्रकरण अद्यापी तप्त असून यासंदर्भात दोन्ही बाजुंकडून एकमेकांवर हल्ले करण्यात येत आहेत. डीआरएसचा पर्याय वापरण्यासाठी स्मिथ याने पुन:पुन्हा अखिलाडु वृत्ती दाखविल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचविणारे विधान भारतीय कर्णधार विराट कोहली याने केले होते. स्मिथ याने या विधानावर आज (बुधवार) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना कोहलीचा हे मत निखालस खोटे असल्याचा दावा केला.

"त्या सामन्यानंतर मी स्वत: माझी चूक असल्याचे मान्य केले होते. मात्र तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून माझ्याकडून ही कृती घडली होती. आम्ही असे सातत्याने करतो, हा दावा निखालस खोटा आहे. कोहली याचे यासंदर्भातील विधान चुकीचे आहे,'' असे स्मिथ म्हणाला.

दरम्यान, या प्रकरणी कोणत्याही खेळाडुची चौकशी न करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने घेतला आहे. भारत व ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेमधील तिसऱ्या कसोटी सामन्यास उद्यापासून (गुरुवार) प्रारंभ होणार आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असताना होत असलेल्या शाब्दिक हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर हा सामना अधिक चुरशीने खेळला जाण्याची शक्‍यता आहे.