द्रविड, लक्ष्मणच्या खेळीला 16 वर्ष पूर्ण

टीम ई सकाळ
मंगळवार, 14 मार्च 2017

लक्ष्मणने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च 281 धावांची खेळी केली. तर, द्रविडने 180 धावा केल्या. लक्ष्मणची ही खेळी भारतीय क्रिकेटपटूकडून कसोटी क्रिकेटमध्ये केलेली सर्वोच्च खेळी होती.

भारतीय संघाच्या मधल्या फळीतील भरवशाचे फलंदाज राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजच्याच दिवशी 2001 मध्ये केलेल्या त्या खेळीला कोणीच विसरू शकत नाही. आज या खेळीला 16 वर्ष पूर्ण होत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) आज दोघांच्या खेळीचा उल्लेख करत या खेळीची आठवण करून दिली आहे. त्यानिमित्त या कामगिरीचा घेतलेला आढावा.

कोलकताचे ईडन गार्डन्स मैदान...ऑस्ट्रेलियासारखा संघ समोर असताना पहिल्या डावात मिळालेल्या फॉलोऑननंतर...दुसऱ्या डावात 4 बाद 254 अशी स्थिती असताना....द्रविड आणि लक्ष्मण यांनी संघाची धावसंख्या 589 पर्यंत पोचविणे आणि भारताने विजय मिळविणे हे सर्व अभूतपूर्व या कसोटीत पहायला मिळाले होते. आताही ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर असून, अद्यापही भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये तेवढ्याच चुरशीने खेळ होताना दिसतो.

क्रिकेट हा जंटलमनचा गेम आहे, हे खऱ्या अर्थाने या कसोटीनंतर आणखी ठळक झाले होते. द्रविड आपल्या भिंतीच्या प्रतिमेची उभारणी करत होता. तर, लक्ष्मणच्या कारकिर्दीत सातत्य नव्हते. पण, या सामन्यातील खेळींनी या दोघांच्या कारकिर्दीला मोठे वळण मिळाले. 14 मार्च 2001 ला द्रविड आणि लक्ष्मण यांनी दिवसभर ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, जेसन गिलेस्पी, मायकेल कॅस्प्रोविझ यासारख्या अव्वल दर्जाच्या गोलंदाजांना मुकाबला केला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील या दोन मोहऱ्यांनी खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियाला पाणी पाजण्याचे काम केले. 

स्टिव्ह वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने संघाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. वॉने शतक झळकावूनही हरभजनने हॅट्ट्रिक घेत 7 बळी घेतल्याने पाचशेच्या आत डाव आटोपला होता. मात्र, भारताचा पहिला डाव अवघ्या 171 धावांत संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन दिला. सलग 15 कसोटी जिंकत विश्वविक्रम करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारतात मात्र अपयशाला सामोरे जावे लागले. भारताने दुसऱ्या डावात 657 धावा करत 383 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 212 धावांत गुंडाळून भारताने 171 धावांनी विजय मिळविला.

लक्ष्मणने पहिल्या डावात अर्धशतक झळकाविल्यानंतर दुसऱ्या डावातील खेळीची जणू चुणूकच दिली होती. त्यानुसार त्याने द्रविडच्या साथीने फलंदाजी करत 376 धावांची भागीदारी केली. लक्ष्मणने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च 281 धावांची खेळी केली. तर, द्रविडने 180 धावा केल्या. लक्ष्मणची ही खेळी भारतीय क्रिकेटपटूकडून कसोटी क्रिकेटमध्ये केलेली सर्वोच्च खेळी होती. मात्र, सेहवागने त्रिशतक झळकावून लक्ष्मणला मागे टाकले. पण, या दोघांच्या खेळीची तुलना करता लक्ष्मणची खेळी ही सरसच असल्याचे कोणीही सांगेल. 

Web Title: VVS Laxman and Rahul Dravid Conquered Australia at Eden Gardens