फलंदाजीची क्रमवारी निश्‍तिच नसते : कुंबळे 

यूएनआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

धोनी हा नुसता फिनिशर्स नाही, तर तो कुठल्याही क्रमांकावर कुठल्याही परिस्थितीत खेळू शकतो. त्याला स्थिरावण्यास वेळ लागत नाही

नवी दिल्ली : एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीचा क्रम हा कधीच निश्‍चित नसतो. खेळपट्टीचे स्वरूप आणि मैदानावरील परिस्थितीनुसार यात वेळोवेळी बदल केला जातो, असे मत भारतीय संघाचे मुख्य मार्गदर्शक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत कुंबळे बोलत होते. पहिल्या सामन्यात कर्णधार धोनीला बढती दिल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. कुंबळे म्हणाले, ""एकदिवसीय सामन्यात फलंदाजीची क्रमवारी कधीच निश्‍चित नसते. आपल्याकडे मनीष पांडे हादेखील चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. एखाद वेळीस सामन्याच्या परिस्थितीनुसार त्या क्रमांकावर दुसरा एखादा फलंदाजही खेळू शकतो. धोनी हा नुसता फिनिशर्स नाही, तर तो कुठल्याही क्रमांकावर कुठल्याही परिस्थितीत खेळू शकतो. त्याला स्थिरावण्यास वेळ लागत नाही.''

कुंबळे यांनी या वेळी हार्दिक पांड्याचेदेखील कौतुक केले. ते म्हणाले, ""त्याच्यामुळे भारतीय गोलंदाजीच्या फळीत योग्य समतोल राखला गेला आहे. त्याने अचूक वेग पकडून गोलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय पदार्पणात अशी गोलंदाजी करणे सोपे नसते. पहिल्याच सामन्यात सामन्याचा मानकरी किताब मिळाल्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल. त्याची कारकीर्द आता कुठे सुरू होत आहे. त्यामुळे त्याच्यावर अपेक्षाचे दडपण लादणार नाही. खेळाडूला स्वातंत्र्य मिळाले की तो बहरतो अशा धाटणीतला हा खेळाडू आहे. आम्ही त्याला गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला आहे.''