आयसीसीच्या बैठकीला नेमके कोण जाणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

‘बीसीसीआय’समोर एक प्रश्‍न सुटला की दुसरा तयार

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कामकाज पाहण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती केली असली, तरी एक सुटला की दुसरा प्रश्‍न बीसीसीआयसमोर उभाच राहात आहे. 

‘बीसीसीआय’समोर एक प्रश्‍न सुटला की दुसरा तयार

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कामकाज पाहण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती केली असली, तरी एक सुटला की दुसरा प्रश्‍न बीसीसीआयसमोर उभाच राहात आहे. 

प्रशासकांची नियुक्ती करताना सर्वोच्च न्यायालयाने विनोद राय हा नवा कर्णधार ‘बीसीसीआय’ला दिला. आयसीसीच्या बैठकीस जाण्यासाठी अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी आणि विक्रम लिमये यांची नावे निश्‍चित केली; पण हाच मुद्दा नवा प्रश्‍न घेऊन आला आहे. आयसीसीने बैठकीला एकाचवेळी तिघांना उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. आयसीसीच्या नियमानुसार बैठकीस केवळ एकच प्रतिनिधी उपस्थित राहू शकतो. 

आयसीसीने या संदर्भात बीसीसीआयच्या प्रशासक समितीला एकाच प्रतिनिधीचे नाव निश्‍चित करा, असे सूचित केले  आहे. आयसीसीच्या विविध बैठका होत असतात, यापैकी कोणत्या बैठकीस कोण उपस्थित राहणार हे प्रशासक समितीने लेखी कळवावे, असे आयसीसीने कळवले आहे. बीसीसीआयच्या प्रतिनिधीकडे विनोद राय यांच्या सहीचे पत्र नसेल, तर त्यास बैठकीस उपस्थित राहण्यास अपात्र ठरविण्यात येईल, असेदेखील आयसीसीने स्पष्ट केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही चौधरींची नावे घेतली असल्यामुळे आता बीसीसीआयमध्ये त्यांची ताकद वाढणार असल्याचीदेखील चर्चा असली, तरी आजच अमिताभ चौधरी यांनी बांगलादेश कसोटी सामन्यासाठी बोलावलेली बैठक राय यांनी बेकायदेशीर ठरवल्याने भविष्यात त्यांच्याकडे फारसे अधिकार राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले. 

सहाजिकच त्यामुळे आता विक्रम लिमये हेच आयसीसीच्या बैठकीस उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी या दोघांकडे बीसीसीआयचे बहुतांश अधिकार राहणार यात शंकाच नाही. प्रशासक समितीची बैठक होईल, तेव्हा सर्वप्रथम बीसीसीआयची कार्यकारिणी कशी असावी, हाच मुद्दा प्राधान्याने चर्चेला येईल. अर्थात, यानंतरही जोहरी यांच्याकडे अधिकार राहणार असल्याची चर्चा असल्यामुळे बीसीसीआयमध्ये येण्यास उत्सुक असणाऱ्यांमध्ये एक अर्थी नाराजी आहे.