पुण्यासारखी खराब कामगिरी पुन्हा दिसणार नाही: कोहली

पीटीआय
शुक्रवार, 3 मार्च 2017

आम्ही पुण्यामधील सामना इच्छाशक्तीच्या अभावामुळे गमावला. ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा नक्कीच चांगली कामगिरी केली. मात्र पुण्यामधील एका पराभवामुळे मालिकेत आता आम्हाला पराभवच स्वीकारावे लागतील, असे नक्कीच नाही

बंगळूर - पुण्यामधील सामन्यासारखी खराब कामगिरी व इच्छाशक्तीचा अभाव पुन्हा दिसणार नाही, असे आश्‍वासन भारतीय कर्णधार विराट कोहली याने दिले आहे. पुणे येथील कसोटी सामन्यामध्ये फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतास ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या तीन दिवसांत पराभव स्वीकारावा लागला होता. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यास उद्यापासून (शनिवार) बंगळूर येथे प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर, कोहली याने पुण्यासारखी वाईट कामगिरी पुन्हा भारतीय संघाकडून होणार नाही, अशी भावना व्यक्त केली.

"पराभव स्वीकारणे महत्त्वाचे आहे. पराभवाकडे दुर्लक्ष केल्यास; वा गर्वाच्या आहारी तो नाकारल्यास त्याचा नकारात्मक परिणाम केवळ स्वत:लाच भोगावा लागतो. आम्ही पुण्यामधील सामना इच्छाशक्तीच्या अभावामुळे गमावला. ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा नक्कीच चांगली कामगिरी केली. मात्र पुण्यामधील एका पराभवामुळे मालिकेत आता आम्हाला पराभवच स्वीकारावे लागतील, असे नक्कीच नाही,'' असे कोहली याने म्हटले आहे. पराभव आवश्‍यक असून त्यामुळे खेळताना झालेल्या चुका समजावून घेण्यास अधिक मदत होते, असे मत भारतीय कर्णधाराने यावेळी बोलताना व्यक्‍त केले.

स्टिव्ह स्मिथ याच्या नेतृत्वाखाली भारताच्या दौऱ्यावर आलेला ऑस्ट्रेलियन संघ हा आत्तापर्यंत भारतात आलेला सर्वांत दुबळा ऑस्ट्रेलियन संघ असल्याचे मत मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात आले होते. मात्र पहिल्याच सामन्यात भारतास मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ही कसोटी मालिका आता अधिक चुरशीने खेळली जाणार असल्याचे निश्‍चित आहे. या पार्श्‍वभूमीवर, कोहली याने व्यक्त केलेले मत अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: You'll not see Pune-like bad performance again, promises Kohli