श्रीनिवासन बीसीसीआयचे प्रतिनिधी नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

श्रीनिवासन हे वैयक्तिक लाभाच्या (कॉन्फ्लिक्‍ट ऑफ इंटरेस्ट) प्रकरणामध्ये दोषी आढळल्याने त्यांना बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करु शकत नाही, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिला.

श्रीनिवासन हे वैयक्तिक लाभाच्या (कॉन्फ्लिक्‍ट ऑफ इंटरेस्ट) प्रकरणामध्ये दोषी आढळल्याने त्यांना बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आयसीसीच्या येत्या 24 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांना मंडळाचे प्रतिनिधित्व करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. याचबरोबर, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनाही या बैठकीस उपस्थित राहण्यास न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने यासंदर्भातील निर्णय दिला.

याआधी, गेल्या 10 एप्रिल रोजी, बीसीसीआयमधील कोणतेही पद व इतर राज्य क्रिकेट संघटनांमधील पदांसाठी "अपात्र' असलेली कोणतीही व्यक्ती आयसीसीसीमध्ये मंडळाचे प्रतिनिधित्व करु शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.