आमच्यासाठी हा "अंतिम' सामनाच स्पेनविरुद्धच्या सामन्यापूर्वी रशियाच्या डेझिम्बाचे मत 

 This "final" match for us says artem dzyuba
This "final" match for us says artem dzyuba

मॉस्को - विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात स्पेनविरुद्ध रविवारी होणारा सामना आमच्यासाठी अंतिम फेरीचाच आहे, असे मत यजमान रशिया संघाचा स्ट्रायकर अर्तेम डेझिम्बाने व्यक्त केले. या सामन्यात माजी विजेत्या स्पेनचा पारडे जड असले, तरी प्रेक्षकांचा पाठिंबा लाभणारे रशिया अंडरडॉग्ज ठरू शकतात. 

घरच्या मैदानावर होत असलेल्या या स्पर्धेत रशियाने सलामीलाच 5-0 असा विजय मिळवून दणक्‍यात सुरवात केली होती; मात्र त्यानंतर त्यांचा प्रवास अडखळता झाला. डेझिम्बा हा स्पेनविरुद्धच्या सामन्यात त्यांचा हुकमी खेळाडू आहे. सौदी अरेबिया आणि इजिप्तविरुद्ध गोल केलेले असल्यामुळे उद्याही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. 

रशियाची स्वप्नवत सुरवात उरुग्वेने गटातील अखेरच्या सामन्यात रोखताना त्यांच्यावर 3-0 असा विजय मिळवला. त्यामुळे रशियन खेळाडूंचा आत्मविश्‍वास कमजोर झाल्याचे बोलले जात आहे. स्टार खेळाडूंचा भरणा असलेला स्पेनचा संघ आणखी एक मोठे आव्हान असेल, असे डेझिम्बाने सांगितले. 

अर्तेम डेझिम्बाला स्पेनचे अनुभवी बचावपटू गेराड पिके, सेरगी रामोस याचा बचाव भेदावा लागणार आहे. जेव्हा तुम्ही वरचढ संघाबरोबर लढता तेव्हा तुम्हाला तुमची क्षमता कळते. रामोस आणि पिके याच्याबरोबर दोन हात करण्यास मी सज्ज आहे. माझ्यासाठी तर हा जीवनभराचा अनुभव असेल. या लढाईत कोण जिंकतो याचीही मला उत्सुकता आहे, असे सांगणाऱ्या डेझिम्बाने स्पेनला या स्पर्धेत अपेक्षित सूर सापडलेला नसल्याचे मान्य केले नाही. 

स्पेनला त्यांच्या लौकिकाप्रमाणे खेळ करता आलेला नाही, असे मी म्हणणार नाही. तो एक बलाढ्य संघ आहे. गटातील सामन्यात केलेल्या चुकांना बाद फेरीत महत्त्व नसते. स्पेनविरुद्ध कसा खेळ करायला हवा याची तयार आम्ही करत आहोत; परंतु ते फेव्हरिट असतील हेसुद्धा मान्य करावे लागेल. उरुग्वेने आम्हाला चांगला धडा दिलेला आहे. त्यातून आम्हाला शिकावे लागेल, असे स्पष्ट मत डेझिम्बाने व्यक्त केले. 

उद्याच्या सामन्यात बहुतांशी सर्व प्रेक्षक रशिया संघाच्या बाजूने असतील. त्यामुळे आम्हाला अंतिम सामन्यासारखाच खेळ करावा लागणार आहे, असे स्पेनचा कर्णधार रामोस म्हणाला. आमचे प्रशिक्षक हिएरो यांच्यात नेतृत्वाचे गुण आहे. ते आम्हाला सतत प्रोत्साहित करत असतात, असेही त्याने सांगितले. 

32 वर्षांत प्रथमच आम्ही बाद फेरीसाठी पात्र ठरलो आहोत. यात अजून किती सुधारणा करता येईल हे आम्हाला पाहायचे आहे. आमच्यासाठी ही तर जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेसारखी लढत आहे. अनुभवी मुष्टियोद्‌ध्याबरोबर नवोदितचा सामना होणार आहे. कोण सर्वोत्तम ठरतो हे पाहायचेय. दिवस जर आपला असेल तर कोणताही संघ कोणालाही पराभूत करू शकतो. - अर्तेम डेझिम्बा, रशियाचा स्ट्रायकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com