फ्रेंच क्रांतीच कायम: उरुग्वेचा 2-0 ने पराभव 

France
France

निझनी नोवगोरोड : ख्रिस्तियानो रोनाल्डोची कोंडी करणाऱ्या उरुग्वेने फ्रान्सचा अव्वल आक्रमक काईल एम्बापे यालाही जखडले; पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या अँतॉईन ग्रिएझमनच्या दोन बहारदार चालींनी माजी विजेत्या फ्रान्ससाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले. 

लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिनाविरुद्ध यशस्वी ठरलेल्या फ्रान्सला नशिबाची साथ लाभली. पोर्तुगालला एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझच्या संयुक्त आक्रमणांनी निष्प्रभ केले होते. कॅवानी दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यानंतरही फ्रान्सची अथक आक्रमणे उरुग्वे रोखत होते; पण पूर्वार्ध संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना अथक प्रयत्नांना यश मिळते, हे फ्रान्सने दाखवले. त्याची भेटच जणू उत्तरार्धात उरुग्वेच्या भरवशाच्या गोलरक्षकांकडून त्यांना लाभली. 

एखादे उत्तमप्रकारे बसवलेले प्रत्येकाचे लक्ष वेधते हेच फ्रान्सच्या पहिल्या गोलबाबत म्हणता येईल. सेट पिसेसवरच हा गोल झाला; पण त्या वेळचे ग्रिएझमनचे कौशल्य जबरदस्त होते. त्याने वेगाने चेंडूवर ताबा घेतला; पण बचावपटूंची रचना पाहून वेग लगेच कमीही केला. तो कमी करतानाच हुशारीने चेंडू अचूक क्रॉस केला. त्याच्या या चालीने उरुग्वे बचावपटूंना नक्कीच गोंधळातच टाकले होते. रॅफेल वॅराने याने वेगाने येताना चेंडूच्या वेगाचाही हुशारीने वापर केला. त्याने चेंडूला अचूक हेडर करीत फ्रान्सचे खाते उघडले. 

फ्रान्सच्या पहिल्या अफलातून गोलला उरुग्वे गोलरक्षकाने उत्तरार्धात जणू बक्षीस दिले. पॉल प्रोग्बाने छान चाल रचली. त्याने 25 यार्डावरील ग्रिएझमनकडे चेंडू अचूक पास केला. बचावपटू नजीक असल्यामुळे ग्रिएजमनला फारशी संधी नव्हती, तरीही त्याने चेंडू गोलपोस्टच्या दिशेने तडखावला. तो गोलीकडे सरळ जात होता. गोलरक्षक मुसलेरा याचा चेंडूला स्पर्शही झाला. त्याच्या बोटाला लागून चेंडू गोलजाळ्यात गेला. त्याचा हात लागला नसता, तर चेंडू कदाचित बाहेर गेला असता. उरुग्वे गोलरक्षकाकडून या प्रकारची चूक अपेक्षित नव्हती. 

गेल्या दोन स्पर्धांत लुईस सुआरेझचा संताप उरुग्वेला ऐन वेळी भोवला होता; पण या वेळी तो शांत राहिला. मात्र, सहकाऱ्यांची त्याला साथ लाभली नाही. तुलनेत कमकुवत बचाव असलेल्या फ्रान्सला चकवण्यात सुआरेझ अपयशी ठरला. कॅवानी नसल्यामुळे फ्रान्सने सुआरेझवर चांगले लक्ष ठेवले होते. उरुग्वेला फ्रेंच क्रांती करण्यात अपयशच आले. सामना संपण्यास 10 मिनिटे असतानाच उरुग्वे खेळाडू, तसेच चाहत्यांचे दुखःद चेहरे निकाल स्पष्ट करीत होते. 

लक्षवेधी 
- लढतीपूर्वी उरुग्वेने चार सामन्यांत मिळून एकच गोल स्वीकारला होता, तर या सामन्यात दोन 
- एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझ एकाच वेळी उरुग्वे संघात नसण्याची ही मार्च 2017 नंतरची ही पहिलीच वेळ. त्या वेळी ब्राझीलविरुद्ध 1-4 असा पराभव 
- रॅफाल वॅराने याचा फ्रान्ससाठी तिसरा गोल. तीनही गोल हेडरवर. यापूर्वीचा गोल मार्च 2015 मध्ये ब्राझीलवर 
- उरुग्वेने पहिला गोल स्वीकारल्यावर विश्वकरंडकातील गेल्या 16 लढतीत विजय (3 बरोबरी, 13 पराभव) मिळवलेला नाही. हे घडलेले असताना यापूर्वीचा विजय 1966 मध्ये फ्रान्सविरुद्ध (2-1) 
- उरुग्वेने फ्रान्सविरुद्धच्या यापूर्वीच्या आठपैकी केवळ एकच लढत गमावली होती 
- ग्रिएजमनचा प्रमुख स्पर्धेच्या बाद फेरीच्या सातव्या लढतीतील सहावा गोल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com