‘रशिया’ मेस्सीसाठी अखेरची संधी

Messi
Messi

रोझारिओ (अर्जेंटिना) - फुटबॉल विश्‍वात लिओनेल मेस्सीला जरूर वरचे स्थान असेल; पण त्याच्या अर्जेंटिनासाठी तो अजूनही ‘हिरो’ नाही. पुढील महिन्यात रशियात सुरू होणारी विश्‍वकरंडक स्पर्धा ही अर्जेंटिनाचा हिरो ठरण्यासाठी मेस्सीला अखेरची संधी असेल, असेच त्याचे चाहते मानत आहेत.

वीस वर्षांपूर्वी रोझारियोतील एन्‍रिको डॉमिनग्वेझ यांनी सर्वप्रथम लिओनेल मेस्सीला चेंडू पायात खेळवताना पाहिले तेव्हा ‘फुटबॉल ही त्याला दैवी देणगी लाभली आहे,’ अशीच पहिली प्रतिक्रिया त्यांच्या तोंडून उमटली. आज त्याच मैदानाच्या मोकळ्या स्टॅंडमध्ये बसून ६७ वर्षीय डॉमिनग्वेझ यांनी आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले,‘‘तेव्हाचा लिओ आजही माझ्यासाठी ‘लिओ’च आहे; पण आज त्याच्याभोवती एक वलय निर्माण झाले आहे. ते अपेक्षितच होते. फुटबॉल विश्‍वात तो सध्या स्वतःशीच स्पर्धा करत आहे. आपलेच विक्रम मोडत आहे; पण आजही तो डिएगो मॅराडोनाच्या मागेच आहे. या वेळी मेस्सी अर्जेंटिनाला विश्‍वकरंडक जिंकून देऊ शकला, तर हे चित्र बदलणार आहे. तो फुटबॉल विश्‍वाचा हिरो आहे; पण अर्जेंटिनाचा हिरो बनण्यासाठी ‘रशिया’ ही त्याच्यासाठी अखेरची संधी आहे.’’

मित्राच्या नजरेतून
मेस्सीचा जिवाभावाचा मित्र आणि शेजारी दिएगो व्हॅलेजोस अजूनही रोझारियोतील एस्टाडो डी इस्राएल स्ट्रीट येथेच राहतो. तो म्हणाला,‘‘लिओ लहानपणापासून खोडकर आणि महत्त्वाकांक्षी होता. फुटबॉलमध्ये तो इतरांपेक्षा खूप पुढे आहे; पण अर्जेंटिनात तो अजून लोकप्रिय नाही. लिओने विश्‍वकरंडक जिंकावा, ही त्याची आयुष्यातील सर्वांत मोठी कामगिरी असेल. अर्जेंटिनाने विश्‍वकरंडक जिंकून आता खूप वर्षे झाली. या वेळी ही इच्छा पूर्ण व्हावी. रोझारियोतील प्रत्येकाला हे वर्ष मेस्सीचे ठरावे असे वाटते.’’

अर्जेंटिनाच्या विजयात मेस्सीची हॅट्‌ट्रिक
ब्युनोस आयर्स - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा आता काही दिवसांवर आली असताना, सराव सामन्यातून विविध संघ आपली तयारी दाखवून देत आहेत. अशाच एका मित्रत्वाच्या सामन्यात अर्जेंटिनाने हैतीचा ४-० असा पराभव केला. या विजयात मेस्सीची हॅटट्रिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सामन्याच्या सतराव्या मिनिटाला पेनल्टीवर मेस्सीने संघाचे खाते उघडले. त्यानंतर उत्तरार्धात ५७ आणि ६५व्या मिनिटाला मेस्सीने दोन गोल केले. त्यानंतर दोनच मिनिटांनी त्याने रचलेल्या चालीवर ॲग्युएरोने चौथा गोल केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com