अखेरच्या क्षणी गोल अन् इंग्लंडचा विजय (मंदार ताम्हाणे)

Harry Kane
Harry Kane

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने केलेल्या दोन गोलमुळे इंग्लंडने ट्युनिशियावर 2-1 असा विजय मिळवित विश्वकरंडक अभियानाची सुरवात गोड केली. इंग्लंडने दुसरा गोल एक्स्ट्रा टाईममध्ये (भरपाई वेळ) करत मिळविलेला हा विजय खास आहे. 

या सामन्याच्या सुरवातीपासूनच इंग्लंडचे सामन्यावर वर्चस्व होते. इ्ंग्लंडने अनेकवेळा गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. अखेर 11 व्या मिनिटाला त्यांना यश आले. हॅरी केनने कॉर्नरच्या मदतीने गोल केला. इंग्लंडच्या अॅशली यंगने मारलेल्या कॉर्नर कीकवर जॉन स्टोन्सने हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला, पण ट्युनिशियाचा गोलकिपर मउज हसेन याने उत्कृष्टरित्या तो अडविला, पण अडविल्यानंतर त्याला धडकून चेंडू थेट हॅरीच्या पायाजवळ गेल्याने केनने त्याचे रुपांतर व्हॉली मारत गोलमध्ये केले. या गोलनंतर इंग्लंडच्या बाजूने आणखी एक जमेची बाजू झाली ती म्हणजे ट्युनिशियाचा गोलरक्षक हसेनला 15 व्या मिनिटाला मैदानाबाहेर जावे लागले. त्याने इंग्लंडच्या खेळाडूंनी गोल करण्याचे केलेले दोन-तीन प्रयत्न उत्कृष्ट बचाव करत अडविले होते. सुरवातीच्या 35 व्या मिनिटापर्यंत ट्युनिशिया इंग्लंडच्या आक्रमक खेळासमोर टिकू शकली नाही. पण, ट्युनिशियाला 35 व्या मिनिटाला वादग्रस्तरित्या पेनल्टी मिळाली. इंग्लंडच्या काईल वॉकर याने ट्युनिशियाच्या एफ बेनी युसुफ याला कोपऱ्याचा धक्का देऊन पाडल्याचे समजून रेफ्रीने त्यांना पेनल्टी दिली. या पेनल्टीचे फेनजानी सासी याने गोलमध्ये रुपांतर करून ट्युनिशियाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे पहिला हाफमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली. 

पहिल्या हाफमधील बरोबरीचा गोल केल्याने ट्युनिशियाच्या खेळाडूंचे मनोबल वाढले. याचा परिणाम दुसऱ्या हाफमध्ये दिसून आला. त्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंना दुसऱ्या हाफमध्ये गोल करण्यापासून रोखले. 90 व्या मिनिटापर्यंत सामना 1-1 अशी बरोबरीत सुटेल आणि आणखी एक बलाढ्य संघ विजयापासून दूर राहिल असे वाटत असतानाच हॅरी केनने 90 (+1) मिनिटाला गोल करत अखेरच्या क्षणी इंग्लंडला विजय  मिळवून दिला. त्यामुळे या सामन्याला नाट्यमयरि्त्या कलाटणी मिळाली. इंग्लंडच्या केरन ट्रिपर याने कॉर्नरद्वारे मारलेला चेंडू हॅरी नॅग्वायरच्या डोक्याला लागून केनच्या डोक्यावर आला आणि त्याने चेंडूला गोलपोस्टकडे दिशा देत संघासाठी विजयी गोल केला. या गोलमुळे इंग्लंडच्या चाहत्यांना जल्लोषाची संधी मिळाली.

इंग्लंडने आतापर्यंत विश्वकरंडक स्पर्धांमध्ये आफ्रिकन खंडातील देशांविरुद्ध सात वेळा सामने खेळले आहेत. त्यात त्यांना एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. या सात सामन्यांपैकी चार सामन्यांत विजय आणि तीन सामने बरोबरीत राहिलेले आहेत. तर, ट्युनिशिया विश्वकरंडात आतापर्यंत खेळलेल्या गेल्या 12 सामन्यांमध्ये एकही सामन्यात विजय मिळवू शकलेले नाही. त्यात 8 मध्ये पराभव आणि चार सामन्यांत बरोबरी झाली आहे. इंग्लंडला गेल्या दहा विश्वकरंडकातील सामन्यानंतर दुसरा गोल मारण्यात यश आले आहे. त्यांनी यापूर्वी 2006 मध्ये स्वीडनविरुद्ध खेळताना दोन गोल केले होते. त्यावेळी 2-2 अशी बरोबरी झाली होती. 

जी ग्रुपमधील सोमवारी झालेल्या सामन्यांमध्ये बेल्जियमने पनामाचा पराभव केला. त्यानंतर इंग्लंडनेही विजय मिळविला. त्यामुळे या ग्रुपमधील दोन बलाढ्य संघांनी अपेक्षित विजय मिळवून तीन गुण मिळविले आहेत. आता या ग्रुपमध्ये बेल्जियम आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात विजय मिळविणारा संघ ग्रुपमध्ये अव्वल असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com