उमटीटीच्या गोलने 'गोल्डन जनरेशन' बाहेर (मंदार ताम्हाणे)

France
France

सॅम्युएल उमटीटी याने हेडरद्वारे मारलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. गोल्डन जनरेशन अशी ओळख असलेल्या बेल्जियमला उपांत्य फेरीतूनच बाहेर पडावे लागले. 

बेल्जियम आणि फ्रान्स यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी केलेला खेळ उत्कृष्ट होता. पण, तो तणावात आणि रणनीती आखून केलेला खेळ होता. पहिल्या हाफमध्ये जरी गोल होऊ शकला नाही, तरीही खेळ रोमांचक झाला. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. पण, फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लोरेस आणि बेल्जियमचा गोलरक्षक कोर्तुएझ यांनी उत्कृष्ट बचाव केला. त्यामुळे पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत सुटला. 

दुसऱ्या हाफमध्ये फ्राऩ्सच्या बचावफळीत खेळणाऱ्या सॅम्युएल उमटीटी याने 51 व्या मिनिटाला अँटोनिओ ग्रीझमनने घेतलेल्या कॉर्नरवर हेडरद्वारे गोल करत फ्रान्ससाठी निर्णायक गोल नोंदविला. बेल्जियमच्या गोल्डन जनरेशनकडे गोल करण्याची क्षमता असलेले खेळाडू असूनही त्यांना गोल करण्यात अपयश आले. फ्रान्सच्या बचावफळीने त्यांना संधीच दिली नाही. मध्यमफळीतील पॉल पोग्बा आणि कांटे यांनी उत्कृष्ट खेळ केला. बचावफळीतील सॅम्युएल उमटीटी आणि रफाएल वरान हे क्लब फुटबॉलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघातून खेळत असले तरी देशासाठी खेळताना त्यांनी महत्त्वपूर्ण खेळ केला. उमटीटी बार्सिलोना आणि वरान रेयाल मद्रिद क्लबकडून खेळतात. बेल्जियमच्या लुकाकू, हजार्ड व केव्हिन डीब्रायन यांना फ्रान्सच्या या खेळाडूंनी रोखून ठेवले. बेल्जियमने यापूर्वीही पिछाडीवरून विजय मिळविले होते. पण, त्यांना या सामन्यात अपयश आले.

या विजयासह फ्रान्स विश्वकरंडकाच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोचले आहे. फ्रान्स यापूर्वी 1998 आणि 2006 मध्ये विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत पोचले होते. यापूर्वी केवळ जर्मनी (8 वेळा) आणि इटली (6 वेळा) हे युरोपियन देश त्यांच्यापेक्षा जास्तवेळा अंतिम फेरीत पोचले आहेत. 1998 नंतर विश्वकरंडकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत खेळणारा संघ म्हणून फ्रान्सची ओळख झाली आहे. बेल्जियमचा हा पराभव कोणत्याही अधिकृत सामन्यांमध्ये सप्टेंबर 2016 नंतर झालेला पहिला पराभव आहे. त्यावेळी त्यांचा पराभव स्पेनकडून झाला होता. 

फ्रान्स रविवारी इंग्लंड व क्रोएशिया यांच्यातील विजेत्यांशी अंतिम फेरीत खेळणार आहे. फ्रान्सचे प्रशिक्षक डिबीयर डेशाम्प हे 1998 च्या विश्वकरंडक विजेत्या फ्रान्सच्या संघाचे सदस्य होते. आता तेच सध्याच्या फ्रान्स संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे यंदा फ्रान्सने विश्वकरंडक जिंकला तर डेशाम्प हे अशी कामगिरी करणारे जगातील तिसरे खेळाडू ठरतील. यापूर्वी अशी कामगिरी ब्राझीलचे मारिओ झगालो आणि जर्मनीचे फ्रान्ज बेकनबावर यांनी केलेली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com