शकिरीच्या गोलने स्वित्झर्लंडचा विजय (मंदार ताम्हाणे)

Xherdan Shaqiri
Xherdan Shaqiri

स्वित्झर्लंडच्या जेर्डान शकिरीने भरपाई वेळेत मारलेल्या गोलमुळे स्वित्झर्लंडने सर्बियाविरुद्ध 2-1 असा विजय मिळविला. सर्बियाचा या सामन्यात पराभव झाला असला तरी अद्याप त्यांचे बाद फेरीत पोहचण्याचे आव्हान जिवंत आहे.
 
सर्बियाला या सामन्यात विजय मिळविल्यानंतर पुढील फेरीत प्रवेश निश्चित होणार असल्याचे माहिती असल्याने त्यांनी सामन्याच्या सुरवातीपासूनच दमदार खेळ केला. सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच सर्बियाने गोल करून आघाडी घेतली.
सर्बियाच्या टॅडीचने दिलेल्या पासवर मित्रोविच याने हेडरद्वारे सर्बियासाठी पहिला गोल केला. सामन्याच्या सुरवातीलाच गोल झाल्याने सामन्यात वर्चस्व मिळविण्यासाठी दोन्ही संघांकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले. त्यामुळे प्रेक्षकांना आक्रमक खेळ पहायला मिळाला. पण, स्वित्झर्लंडला पहिल्या हाफमध्ये बरोबरी करण्यात अपय़श आल्याने सर्बिया 1-0 आघाडीवर राहिले.

दुसऱ्या हाफमध्ये 53 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या ग्रामीत झाका याने 25 यार्डावरून जोरदार शॉट मारून उत्कृष्ट गोल केला आणि स्वित्झर्लंडला 1-1 अशी बरोबरी करून दिली. यानंतर दोन्ही संघांनी विजय मिळविण्याचा भरपूर प्रयत्न केले. तसेच दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधीही मिळाल्या. पण, अखेर 90 (+1) मिनिटाला स्वित्झर्लंडच्या जेर्डान शकिरी याने हाफलाईनपासून चेंडू सर्बियाच्या गोलपोस्टकडे नेत उत्कृ्ष्ट सोलो गोल मारून शेवटच्या क्षणाला स्वित्झर्लंडला विजय मिळवून दिला. यंदाच्या विश्वकरंडकात पहिल्यांदाच 1-0 असा पिछाडीवर असलेला संघ विजय मिळवू शकला आहे. स्वित्झर्लंडने ही कामगिरी करत पिछाडीवर असूनही विजय मिळविला. 

ई ग्रुपमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात ब्राझीलने कोस्टारिकाचा 2-0 असा पराभव केला होता. त्यामुळे या ग्रुपमध्ये ब्राझील चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर, स्वित्झर्लंडही विजयासह चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या ग्रुपमध्ये शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात सर्बियाला पुढील फेरीत पात्र होण्यासाठी बलाढ्य ब्राझीलचा पराभव करणे गरजेचे आहे. तर, स्वित्झर्लंडला कोस्टारिकाविरुद्धच्या सामना बरोबरीत सोडविला तरी त्यांचा पुढील फेरीतील प्रवेश निश्चित आहे.

सर्बिया स्वतंत्र देश झाल्यापासून विश्वकरंडकात खेळताना त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाने गोल केल्यानंतर त्यांना सहाव्यांदा पराभव स्वीकारावा लागला आहे. स्वित्झर्लंड गेल्या 24 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये फक्त एकदा पराभूत झाले आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये पोर्तुगालने विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीत स्वित्झर्लंडचा 2-0 असा पराभव केला होता. स्वित्झर्लंडने या 24 सामन्यांमध्ये 17 विजय आणि 6 सामने बरोबरीत सोडविले आहेत. त्यामुळे जागतिक क्रमवारीत ते सहाव्या स्थानावर आहेत. स्वित्झर्लंडने विश्वकरंडकात केलेल्या शेवटच्या सहा गोलमध्ये जेर्डान शकिरीचा वाटा मोलाचा आहे. या सहा गोलमध्ये शकिरीने स्वतः केलेले पाच आणि त्याच्या पासवर झालेला एक गोल आहे. त्यामुळे शकिरी स्वित्झर्लंड किती महत्त्वाचा खेळाडू आहे, हे त्याने दाखवून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com