रशियाविरुद्ध स्पेन, डेन्मार्कविरुद्ध क्रोएशियाचे पारडे जड 

Maradona Column about football match
Maradona Column about football match

विश्‍वकरंडकाच्या बाद फेरीतील पहिल्या दिवशी तुल्यबळ संघ आमनेसामने होते. दुसऱ्या दिवसाच्या दोन सामन्यांवर मात्र पैज लावणे सुरक्षित ठरू शकेल. खेळातील अनिश्‍चितता विचारात घेतली, तरी यजमान रशियाविरुद्ध स्पेन, तर डेन्मार्कविरुद्ध क्रोएशिया दावेदार आहेत. 2010 मधील विजेतेपदानंतर स्पेनला पुढील स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद व्हावे लागले. या वेळी जर्मनीवर अशी वेळ आली. यामागील कारणे समान आहेत. दोन्ही संघ कारकिर्दीचा बहर संपलेल्या अनुभवी खेळाडूंवर प्रमाणाबाहेर अवलंबून होते. रशियात दाखल झालेल्या स्पेनच्या संघातही आठ वर्षांपूर्वी विजेता ठरलेल्या संघातील काही स्टार आहेत; पण फरक असा की अनुभवी खेळाडूंच्या जोडीला नव्या कल्पनांचा अवलंब केलेले ताज्या दमाचे खेळाडू आहेत. अलीकडच्या काळात मैदानावर आणि मैदानाबाहेर आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेलेला हा भक्कम संघ "टॉप गिअर' टाकण्याची अपेक्षा आहे. 

"अंडरडॉग'कडून आशा 
या पार्श्‍वभूमीवरही "अंडरडॉग' म्हणजे पारडे जड नसलेल्या संघांनी सरस प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देणे मला आवडेल. स्पेनच्या तुलनेत गुणवत्तेच्या बाबतीत रशियन बरेच पिछाडीवर असतील, पण दोन दणदणीत विजयांसह बाद फेरी गाठताना त्यांनी योग्य दृष्टिकोन प्रदर्शित केला आहे. उरुग्वेने अखेरच्या सामन्यात 3-0 अशा विजयासह यजमानांचा "मूड' खराब केला. यानंतरही भरगच्च ल्युझ्नीकी स्टेडियमवर उत्तुंग प्रोत्साहन देणाऱ्या पाठीराख्यांसमोर यजमान संघाला सामोरे जाणे अवघड ठरू शकते.

आपल्या क्षेत्रात संख्यात्मक वर्चस्व राखून प्रतिस्पर्ध्याला झुंजविता येते, हे लहान संघांनी या स्पर्धेत दाखवून दिले. आइसलॅंड-अर्जेंटिना, दक्षिण कोरिया-जर्मनी, स्वित्झर्लंड-ब्राझील अशा लढतींची उदाहरणे देता येतील. मला वाटते, की यजमानसुद्धा अशाच डावपेचांचा अवलंब करतील आणि प्रतिआक्रमणासाठी वेग पणास लावतील. याचे कारण म्हणजे स्पेनचा संघ जास्त आक्रमक खेळ करेल. अटीतटीचे सामने खेळून आल्यामुळे स्पेनचा आत्मविश्‍वाससुद्धा उंचावलेला असेल. जोपर्यंत रशियन प्रतिकार करतील तोपर्यंत लढत रंगतदार ठरेल. 

क्रोएशियाचे नियंत्रण सरस 
दुसऱ्या लढतीविषयी बोलायचे झाल्यास क्रोएशिया या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरलेल्या संघांमध्ये आहे. उरुग्वे आणि बेल्जियम यांनीसुद्धा गटात तिन्ही सामने जिंकले, पण पूर्व युरोपमधील क्रोएशियासारखे नियंत्रण कुणालाच राखता आले नाही. ल्युका मॉड्रीच याला कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्म गवसला आहे. रेयाल माद्रिद संघाचा महत्त्वाचा घटक असलेला मॉड्रीच क्रोएशियासाठी "लीडर' आहे. संघाच्या खेळाला तो दिशा देतो. इव्हान रॅकिटीच विश्‍वकरंडकानंतर मॉड्रीचच्या रेयालचा प्रतिस्पर्धी असलेल्या बार्सिलोनात दाखल होईल. येथे मात्र या दोघांची मध्य फळीत जमलेली जोडी हेवा वाटावी अशी आहे. बचाव आणि आक्रमण कसे करायचे, याची त्यांना कल्पना आहे. अनुभव आणि दर्जाच्या जोरावर हा संघ विजेतेपदाच्या शर्यतीत "डार्क हॉर्स' ठरला आहे. 

डेन्मार्ककडे शिस्त 
डेन्मार्कचा संघ फ्रान्सविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधताना केला तसा खेळ पुन्हा करण्याच्या प्रयत्नात असेल. काही वेळा डेन्मार्क भरकटल्यासारखा वाटला. त्यांना केवळ दोनच गोल करता आले आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्याविरुद्धचा एकमेव गोल पेनल्टीवर झाला. डेन्मार्क अद्याप अपराजित आहे. त्यांच्या बचाव फळीत युरोपीय संघांचे वैशिष्ट्य असलेली आनंद वृत्ती दिसते. त्यांच्याकडे शिस्त असून, संघ म्हणून खेळ करण्यात ते तरबेज आहेत. क्रोएशियाला कडवी झुंज देण्यासाठी या सर्व गुणांची गरज लागेल. झुंजार खेळ करण्याची जिगर दाखविणाऱ्या संघांचा मी "फॅन' आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. आपले अस्तित्व जाणवून देण्यासाठी "अंडरडॉग'ना जिद्दीच्या जोडीला अशा शुभेच्छांचीसुद्धा गरज असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com