हेडिंगवरील गोलपासून क्रोएशियाला राहावे लागेल सावध

Maradona writes about Croatia vs England Semi Final
Maradona writes about Croatia vs England Semi Final

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत लागोपाठ दोन सामन्यांत टायब्रेकला सामोरे जाण्यामुळे प्रचंड मानसिक ताण येतो. हे मी स्वानुभवावरून सांगत आहे. 1990च्या स्पर्धेत आमच्यावर हीच वेळ आली. मी कर्णधार असताना उपांत्यपूर्व फेरीत युगोस्लाव्हिया, तर उपांत्य फेरीत इटलीला आम्ही टायब्रेकमध्ये हरविले. क्रोएशियाने पण हेच केले आहे, फक्त फरक हाच की हे एक फेरी आधीच्या टप्यांत घडले आहे. 

बाद फेरीत एकूण 240 मिनिटांचा खेळ आणि शिवाय दोन टायब्रेकमुळे एखादा संघ खचून जाऊ शकतो. 1990च्या स्पर्धेत अंतिम सामन्याच्या वेळी आम्हाला याचे प्रतिकूल परिणाम जाणवले. तशा परिस्थितीतही आम्ही प्रयत्न केले. अखेरीस आम्हाला अन्यायकारक पेनल्टीमुळे पराभूत व्हावे लागले हे चाहत्यांच्या लक्षात असेल. याशिवाय आमच्या खेळाडूंना दोन लाल कार्ड दाखविण्यात आल्याचाही उल्लेख करावा लागेल. 

सुबासिचविषयी सहानुभूती 

मी ही चर्चा करण्याचे कारण म्हणजे अशा परिस्थितीवर मात करणे, त्यानंतर सुसज्ज होणे आणि तीन दिवसांत विश्‍वकरंडक उपांत्य सामन्याला सामोरे जाणे हे सर्व करण्यासाठी क्रोएशियाचा कमालीचा कस लागेल. क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनिएल सुबासिच याच्याविषयी मला कमालीची सहानुभूती वाटते. आमच्या सर्जिओ गोयकोचीया याच्याप्रमाणेच त्याने दोन टायब्रेकमध्ये संघाला तारले. रशियाविरुद्ध दुसऱ्या सत्रात दुखापत झाल्यानंतरही तो खेळ राहिला. त्याने सर्वोत्तम खेळ केला आणि अंतिम टप्प्यातील थरारनाट्यात एक फटका अडविला. 

इंग्लंड संघ ताजातवाना 

अशाच झुंजार खेळाची आणखी एकदा पुनरावृत्ती करणे क्रोएशियासाठी अवघड असेल, पण त्यांच्यासमोर दुसरा पर्यायसुद्धा नाही. अंतिम फेरीच्या इतक्‍या जवळ आल्यानंतर हरायला कोणत्याच संघाला आवडत नाही. झ्लाट्‌को डॅलिच यांचा संघ त्यासाठी तीव्रतेने आतुर असेल. दुसरीकडे गॅरेथ साऊथगेट यांचा इंग्लंड संघ तुलनेने ताजातवाना असेल. बाद फेरीत त्यांना टायब्रेकला सामोरे जावे लागले, पण त्यांचा उपांत्यपूर्व सामना निर्धारित 90 मिनिटांत संपला. 
या दोन संघांच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या वाटचालीवर नजर टाकल्यास त्यात एक ठळक बाब दिसेल. इंग्लंडचे बहुतेक गोल "सेट-पिसेस'वर झाले आहेत. ते "बॉक्‍स'मध्ये चेंडू मारतात आणि हेडींगच्या जोरावर फिनीशिंग करतात. अशा पद्धतीने स्कोअरिंग करणारा हॅरी केन हा एकमेव खेळाडू नाही. क्रोएशियाला अशा चेंडूंवर बचाव करताना अडचणी आल्या. त्यांच्याविरुद्ध हेडिंगवर काही गोल यापूर्वीच झाले आहेत. यातील अलीकडच्या गोलमुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला अतिरिक्त वेळेत बरोबरी साधता आली. क्रोएशियासाठी ही चिंतेची बाब आहे, पण क्रोएशिया अद्याप अपराजित आहे आणि ही आकडेवारी चांगली आहे. आता मात्र पहिलाच पराभव होऊनही त्यांना बाद व्हावे लागेल. यासंदर्भात दोन्ही संघांना सावध राहावे लागेल. 

इंग्लंडचा वेग सरस 

क्रोएशियाचा संघ चाली रचण्यास जास्त वेळ घेतो. ल्युका मॉड्रीच याच्या नेतृत्वाखाली त्यांची मध्य फळी आपापसांत पासिंग करीत चेंडू ताब्यात ठेवते. ही गोष्ट ते चांगली करतात. आगेकूच करून संधी निर्माण करणे किंवा गोलसाठी प्रयत्न करणे या बाबतीत मात्र ते कमी फलदायी ठरतात. याबाबतीत इंग्लंडचा संघ जास्त उद्दीष्ट ठेवून खेळतो. मुसंडी मारून पेनल्टी बॉक्‍सच्या जवळ ते चांगल्या वेगाने जातात. ते कमी पासेसमध्ये हे करतात. बॉक्‍समधील आकडेवारी काहीही असली तरी स्वीडनच्या बचाव फळीपेक्षा ते सरस ठरले. त्यांनी अवघड वाटणारे आव्हान अगदी सोपे ठरविले. 

क्रोएशियाची बचावाची पद्धत मला आवडते. ते कडवे लढवय्ये आहेत. मैदानावर ते बरीच निष्ठा आणि सकारात्मक देहबोली प्रदर्शित करतात. आक्रमकता हा केवळ आघाडी फळीचा गुण असत नाही. चांगल्या बचावपटूंकडे सुद्धा बरीच आक्रमकता असते आणि पूर्व युरोपीय खेळाडूंकडे तुम्हाला ती बरीच दिसू शकते. मैदानावरील "पोझिशन'च्या बाबतीत मूलभूत गोष्टी योग्य पद्धतीने करण्यासाठी ते शिस्त दाखवितात. ते संघटित असतात. विश्‍वकरंडकाच्या या टप्प्यास भाकीत न करणेच चांगले असते हे मला ठाऊक आहे, पण या सामन्यापूर्वीची स्थिती आणि बलाबल लक्षात घेता क्रोएशियाची दडपणाला यशस्वीपणे सामोरे जाण्याची कठीण कसोटी असेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com