मेस्सीला साथ देण्याची सहकाऱ्यांवर जबाबदारी

Messi in need of support from team members
Messi in need of support from team members

विश्‍वकरंडकातील सुरवातीचे नाट्य आता संपले आहे. गतविजेत्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. सर्वोत्तम 16 संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. आता खऱ्या फुटबॉलची वेळ आली आहे. यात उच्च दर्जाचे लढवय्ये तग धरतील. यापुढे केवळ कौशल्य आणि डावपेचच नव्हे तर मनोधैर्यसुद्धा निर्णायक ठरेल. जे आधी कच खातील ते बाजूला पडतील.
साधारणपणे बाद फेरीत उत्कंठावर्धक "ऍक्‍शन' दिसते. या वेळी सुरवातीपासून तुलनेने थोडी जास्त चुरस दिसून आली. फ्रान्सविरुद्ध अर्जेंटिना आणि उरुग्वेविरुद्ध पोर्तुगाल हे "हेवीवेट' संघांमधील मुकाबले आहेत. स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यात अशा लढतींची अपेक्षा असते. आगेकूच केलेल्या संघांची वाटचाल वेगवेगळ्या पद्धतीने झाली, पण आता ते शून्यातून सुरवात करतील. कोणीही "फेव्हरीट' असणार नाही.
फ्रान्सने तीन सामन्यांतून सात गुणांसह गटात अव्वल स्थान मिळविले. त्यांनी तीन गोल केले. यात एका स्वयंगोलचा समावेश आहे. याचा अर्थ प्रत्यक्षात त्यांना दोनच गोल करता आले. यावरून त्यांचे आक्रमण कागदावर भक्कम दिसते, पण ते रोखता येणे अशक्‍य नाही. खेळाडूंच्या जागेची धूर्त रचना, अथक "मार्किंग' आणि योग्य दृष्टिकोनाच्या जोरावर फ्रेंचांना जेरीस आणता येईल. जोर्गे साम्पोली यांच्या खेळाडूंना आपली सर्वोच्च क्षमता पणास लावून हे करावे लागेल.

फ्रान्सची मध्य फळी बलस्थान
दुसरीकडे मध्य फळी हे फ्रान्सचे बलस्थान आहे. चाली रोखणारे आणि रचणारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. पॉल पोग्बा आणि एन्गोलो कॅंटे यांचे अस्तित्व भक्कम असते, पण अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरी गाठेल असा विश्‍वास मला वाटतो. फ्रान्सची संधी मात्र मी नाकारणार नाही. दोन्ही संघ आतापर्यंत क्षमतेनुसार खेळू शकलेले नाहीत. ते करून दाखविण्याची वेळ आता आली आहे.

अर्जेंटिनाला सकारात्मक धडे
अर्जेंटिनाला सुरवातीला झगडावे लागले. बचावातील कमकुवतपणा, लिओ मेस्सीवर वाजवीपेक्षा जास्त अवलंबून राहणे, डावपेचांवरील टीका इथपासून संघनिवडीपर्यंत अनेक समस्या होत्या. प्रभावहीन सुरवातीनंतरही त्यांना जीवदान मिळाले. अखेरच्या सामन्यात धाडसी खेळ करीत त्यांनी याचा फायदा घेतला. बाद फेरीतील चुरशीची झलक त्यांनी यापूर्वीच अनुभवली आहे. त्यामुळे त्यातून मिळालेले सकारात्मक धडे त्यांच्या जमेची बाब असेल.

मेस्सीला हवी साथ
अर्जेंटिनाला संघ म्हणून झुंज द्यावी लागेल. लिओ केवळ त्यालाच जमतात अशा गोष्टी करू दाखविण्याच्या प्रयत्नात असेल. इतरांनी आपली जबाबदारी पार पाडणे तेवढेच महत्त्वाचे असेल. सांघिक खेळ करण्याची क्षमता खेळाडूंनी दाखवून दिली आहे. त्यांना हेच पुन्हा करून दाखवावे लागेल. ही कसोटी आणखी अवघड आहे. मध्य आणि बचाव फळीवर आणखी दडपण असेल. जेव्हीयर मॅशेरॅनो आणि निकोलस ओटामेंडी यांनी सर्वोत्तम खेळ करणे आमच्या गरजेचे असेल. दोन महत्त्वाच्या क्षेत्रांत त्यांना पुढाकार घ्यावा लागेल.

स्टार स्ट्रायकर महत्त्वाचे
दक्षिण अमेरिकाविरुद्ध युरोप यांच्यातील दुसऱ्या लढतीत कदाचित दोन स्टार स्ट्रायकर निर्णायक ठरतील. ख्रिस्तीयानो रोनाल्डोने हॅट्‌ट्रीकने प्रारंभ केला. पेनल्टी दवडली नसती तर तो सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत संयुक्त आघाडीवर गेला असता. लिओने आधी एक पेनल्टी दवडली होती. अशा गोष्टी घडतात, पण मातब्बर खेळाडू त्यानंतर यशासाठी आणखी आतुर बनतात. लुईस सुआरेझ हा सुद्धा चुरशीच्या सामन्यांत निर्णायक ठरेल असा चमकदार खेळ करू शकतो. आपल्या देशाच्या अपेक्षांचे ओझे पेलण्याची मदार या दोघांवर असेल.
दोन्ही संघांच्या बचाव फळीवर दडपण असेल. प्रतिस्पर्धी आक्रमक आपल्या क्षेत्रात येऊ नयेत म्हणून मध्य फळीकडून बरेच प्रयत्न केले जातील. अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची सवय उरुग्वे आणि पोर्तुगाल या दोन्ही संघांना आहे. मध्य आणि बचाव फळीत संघटित स्वरूप कायम ठेवण्याचे मार्ग दोन्ही संघांनी तयार केले आहेत. प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणणारे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. काही वेळा धसमुसळा खेळ होईल, पण मुकाबला रंगतदार ठरेल. स्पर्धेच्या या टप्प्यास तुल्यबळ संघ आमनेसामने येतात तेव्हा तुम्हाला अशीच अपेक्षा असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com