'सुपर ईगल'च्या भरारीने आइसलॅंड कोलमडले

Nigeria beats Iceland in football World cup
Nigeria beats Iceland in football World cup

वोल्गोग्राड, ता. 22 ः पूर्वार्धात आइसलॅंडच्या पकडीत सापडलेल्या सुपर ईगल नायजेरियाने उत्तरार्धाच्या सुरवातीसच ताकदवान भरारी घेतली आणि त्यानंतर आइसलॅंडला त्यांना रोखण्याचे स्वप्नही बघता आले नाही. नायजेरियाच्या 2-0 विजयामुळे लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाच्या आव्हानासही धुगधुगी लाभली.

पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीनंतर आइसलॅंड सूत्रे हाती घेऊ शकेल, या तज्ज्ञांच्या अपेक्षांना अहमद मुसाने धक्का दिला. त्याच्या या गोलने आइसलॅंडचा आत्मविश्‍वास खच्ची केला. आइसलॅंडच्या थ्रोवर नायजेरियाने चेंडूचा ताबा घेतला. व्हिक्‍टर मोझेसने आइसलॅंड बचावपटूंना वेगाने चकवत चेंडू अचूकपणे अहमद मुसाकडे क्रॉस केला. मुसाने चेंडूवर ताबा घेतला. आपल्या भोवतीच्या बचावपटूंचा आढावा घेतला आणि संधी मिळताच चेंडूला गोलजाळ्यात धाडले.
लॉंग थ्रो इन हीच आइसलॅंडची ताकद. त्यावरच गोल झाल्याने त्यांचा आत्मविश्‍वास खच्ची झाला. त्याचा फायदा घेत नायजेरियाने आक्रमणाचा वेग जरा जास्तच वाढवला. सलामीच्या सामन्यात स्वयंगोलचा डाग लागलेला एटेबो प्रतिआक्रमणात मोलाची कामगिरी बजावत होता. नायजेरियाने दोन्ही बगलांतूनही आक्रमणाचा वेग वाढवल्याने आइसलॅंड काहीसे खच्ची झाले. त्यातच गोलच्या पिछाडीने हार टाळण्यासाठी आक्रमण करणे भाग पडले. बचावावर पूर्ण भर दिल्यावर आक्रमण करणे अवघड होते, त्यामुळेच आइसलॅंड कोलमडू लागले.

नायजेरियाच्या ताकदवान आक्रमकांनी सामन्यातील वातावरण तापले आणि त्यासमोर आत्तापर्यंत भक्कम वाटत असलेले आइसलॅंड वितळू लागले. त्यांच्याकडून चुका होण्यास सुरवात झाली. त्याचा फायदा पुन्हा मुसाने घेतला आणि आइसलॅंडच्या विजयासह बाद फेरी गाठण्याच्या स्वप्नांवरच पाणी फिरले. आता त्यांना क्रोएशियाविरुद्ध विजयच आवश्‍यक ठरेल. त्याचबरोबर नायजेरिया- अर्जेंटिना लढतही त्यांची वाटचाल ठरवेल.

- नायजेरियाचा पूर्वार्धात एकही शॉट नव्हता; पण उत्तरार्धातील 14 सेकंदासच पहिला शॉट
- चार वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाला अल्जेरियाविरुद्ध एकही शॉट नोंदवता आला नव्हता
- अहमद मुसा याचे एकाच सामन्यात दोन गोल. ही कामगिरी नायजेरियाच्या बहुतेक खेळाडूंना सर्व स्पर्धांत मिळून साधली आहे.
- मुसाने नायजेरियाचे विश्वकरंडकातील गेले चारही गोल केले

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com