युरो करंडक: पोर्तुगालला ऐतिहासिक विजेतेपद

युरो करंडक: पोर्तुगालला ऐतिहासिक विजेतेपद

मार्सेली : ख्रिस्तियानो रोनाल्डोची दुर्दैवी दुखापतीनंतर भक्कम बचाव आणि एडरसारख्या खेळाडूने अनपेक्षितरित्या आक्रमण करत ‘एक्स्ट्रा टाईम‘मध्ये केलेल्या गोलमुळे पोर्तुगालने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपविला. यंदाच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पोर्तुगालने फ्रान्सवर १-० अशी मात केली.

युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिला भाग पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दुर्दैवी दुखापतीमुळेच गाजला. या लक्षवेधी अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी कायम राहिली.

रोनाल्डो वगळता पोर्तुगालच्या आक्रमणात फारशी धार नाही, हे सर्वच संघांना ठाऊक असल्याने फ्रान्सनेही रोनाल्डोची कोंडी करण्यावरच भर दिला होता. एका क्षणी चेंडूवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नांत रोनाल्डोच्या पायाला दुखापत झाली. सुरवातीस त्याने मैदानावरच उपचार घेतले. त्यानंतर पुन्हा दुखापत जाणवू लागल्याने तो काही क्षण मैदानाबाहेरही गेला. मात्र, तोपर्यंत बदली खेळाडू पाठविण्यात आला नसल्याने पोर्तुगालच्या समर्थकांची आशा कायम होती. काही वेळाने रोनाल्डो पुन्हा मैदानात उतरला आणि काही मिनिटे झाल्यानंतर त्याला या दुखापतीसह खेळणे अशक्य झाले. वैद्यकीय सहाय्यक स्ट्रेचरवरून बाहेर घेऊन जात असताना रोनाल्डोला निराशा लपविता आली नाही.

या दुखापतीचा भाग वगळता पहिल्या भागात फ्रान्सने निम्म्याहून अधिक काळ चेंडूवर ताबा राखला. त्यांनी पहिल्या ४५ मिनिटांत पोर्तुगालच्या गोलपोस्टवर तीन वेळा आक्रमणे रचली; मात्र तीनही आक्रमणे निष्फ़ळ ठरली. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला रोनाल्डो मैदानाबाहेर गेल्यानंतर पोर्तुगालने पहिल्या भागात गोल करण्याचे फारसे प्रयत्नही केले नाहीत. फ्रान्सला गोल करण्यापासून रोखण्यावरच त्यांनी भर दिला होता. 

गोलशून्य बरोबरी कायम असल्याने दोन्ही संघांनी शेवटच्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये ताज्या दमाचे खेळाडू मैदानात उतरवून नव्या योजना आखण्यावर भर दिला. यात अखेरच्या दहा मिनिटांत पोर्तुगालने वर्चस्व राखले. त्यांनी सातत्याने फ्रान्सच्या गोलपोस्टवर आक्रमक चाली रचल्या. अखेरच्या काही मिनिटांमध्ये फ्रान्सनेही प्रत्युत्तरादाखल काही चाली रचल्या; पण गोल करण्यात कुणालाही यश आले नाही. अतिरिक्त वेळेमध्ये फ्रान्सच्या जिग्नॅकने पोर्तुगालच्या गोलरक्षकाला चकवून चेंडू जाळीच्या दिशेने ढकलला; मात्र गोलपोस्टच्या खांबाला धडकल्यामुळे फ्रान्सची संधी हुकली. 

एक्स्ट्र्रा टाईममधील पहिल्या १५ मिनिटांमध्ये पोर्तुगालने आक्रमणाची धार वाढवली. तरीही गोलशून्य बरोबरी कायमच राहिली होती. पोर्तुगालच्या आक्रमणांसमोर फ्रान्सच्या बचावातील उणीवा या सत्रामध्ये अधिक उघडपणे दिसून आल्या. याचाच फायदा पोर्तुगालने उत्तरार्धात घेतला. मॉन्टिन्होने दिलेल्या पासवर एडरने २५ यार्डांवरून थेट गोल करत पोर्तुगालला ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

गोल झाल्यानंतर पोर्तुगालने केवळ चेंडूचा ताबा स्वत:कडे ठेवत वेळ वाया घालवण्यावरच भर दिला. एडरच्या त्या गोलमुळे घरच्या मैदानावर युरो करंडक स्पर्धा जिंकण्याचे फ्रान्सचे स्वप्न अपूर्णच राहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com