माजी विजेत्या स्पेनचा रशियाकडून 'शूटआउट'

russia wonderful win vs spain
russia wonderful win vs spain

मॉस्को : चेंडूवरील एकतर्फी वर्चस्व, यशस्वी पासेस, यानंतरही स्पेनला गोलचा दुष्काळ संपवता आला नाही. रशियाच्या चिवट बचावाने त्रासलेल्या स्पेनला लढत पेनल्टी शूटआउटमध्ये नेण्याचा फटका बसला. रशिया गोलरक्षकाने दोन पेनल्टी किक रोखत स्पेनला स्पर्धेतून बाद केले. 

पोर्तुगाल, अर्जेंटिना या संभाव्य विजेत्यांपाठोपाठ स्पेनवरही उपउपांत्यपूर्व फेरीत गारद होण्याची वेळ आली. उरुग्वेच्या पोर्तुगालवरील विजयापेक्षा रशियाचा स्पेनवरील विजय धक्कादायक आहे. स्पेनचे यशस्वी पास रशियाच्या पाचपट होते. गोलप्रयत्न चौपट होते; पण स्पेनला जोशपूर्ण आक्रमणाऐवजी काहीसा सावध खेळ केल्याचा फटका बसला. 

स्पेनचा छोट्या पासेसचा अर्थातच टीका टाकाचा खेळ चेंडूवर वर्चस्व राखत होता; पण रशियाने सुरुवातीस गोल केल्यामुळे दडपणाखाली गेलेले स्पेन पूर्ण बहरात आक्रमण करण्यास तयार नव्हते. एखादी चूक झाली, तर आपले आव्हान संपेल, अशी धास्तीच त्यांना जाणवत असल्याचे प्रामुख्याने जाणवत होते. 

रशियाला चाहत्यांचा जोरदार पाठिंबा होता. आपल्या अपेक्षेपेक्षा संघाने चांगली कामगिरी केल्याची त्यांची भावना होती; पण माजी जगज्जेत्यांविरुद्ध खेळत असल्याचे दडपण रशियावर होते. त्यातच स्पेनचे प्रभावी पासेस रशियाला जोरदार आक्रमणापासून रोखत होते. खेळ प्रामुख्याने मैदानाच्या मध्यभागीच झाल्याने ही लढत कंटाळवाणीच झाली. रशिया प्रेक्षकांचा उत्साह, त्यांचा सुरू असलेला जल्लोष हीच प्रामुख्याने जमेची बाब दिसत होती. 

रशियावर सुरुवातीस नशीब रुसले आहे, असेच वाटले. सर्जिओ रामोस याला यशस्वी मार्किंग करीत असलेल्या इग्नाशेविच याने क्रॉसकडे पाठ फिरवली. चेंडू त्याच्या बूटला लागून गोलजाळ्यात गेला; मात्र रशियाने पेनल्टी किकवर गोल करीत याची बरोबरी साधली. 

लक्षवेधक 
- रशिया पेनल्टी शूटआउट खेळणारे सातवे यजमान, सलग पाचव्या लढतीत यजमानांची बाजी 
- विश्वकरंडक, युरो, कॉन्फेडरेशन्समध्ये स्पेनचे यापूर्वी पेनल्टी शूटआउटवर 5-3 वर्चस्व; पण या वेळी हार 
- स्पेनचा स्पर्धा इतिहासातील हा सातवा एक्‍स्ट्रॉ टाईम, तर रशियाचा तिसरा 
- एकाच सामन्यात स्वयंगोल आणि पेनल्टी किकवर गोल होण्याची ही या स्पर्धेतील तिसरी वेळ, यापूर्वीच्या सर्व स्पर्धांत मिळून चार वेळा 
- आर्तीम झुबा याचा विश्वकरंडकातील रशियाच्या गेल्या सातपैकी चार गोलमध्ये सहभाग 
- एकाच स्पर्धेत दोन स्वयंगोल करणारा रशिया 1966 पासूनचा दुसरा संघ, यापूर्वी बल्गेरिया 
- स्वयंगोलचा शिक्का लागलेला सर्गेई इगानशेविच हा स्पर्धेतील सर्वांत बुजुर्ग खेळाडू (38 वर्षे 352 दिवस) 
- स्पेनचे सलग 24 स्पर्धात्मक लढतीत गोल 

असा झाला पेनल्टी शूटआउट 
- आंद्रेस इनिएस्ताचा गोल, स्पेन 1-0 
- फेदॉर स्मोलॉव याचा गोल, रशिया 1-1 
- गेरार्ड पिक्वे याचा गोल, स्पेन 2-1 
- सर्गेई इग्नाशेविचचा गोल, रशिया 2-2 
- कोकेची किक इगॉर अकिनफीवने रोखली, रशिया 2-2 
- अलेक्‍झांडर गोलोविनचा गोल, रशिया 3-2 
- सर्जिओ रामोसचा गोल, स्पेन 3-3 
- डेनिस चेरीशेवचा गोल, रशिया 4-3 
- लॅगो ऍस्पासची पेनल्टी इगॉरने रोखली, रशिया 4-3 सरशी 

स्पेन वि. रशिया 
गोल 1 1 (शूटआऊट 3-4) 
शॉट्‌स 25 6 
ऑन टार्गेट 9 1 
कॉर्नर्स 6 5 
ऑफसाइड 1 1 
चेंडूवर वर्चस्व 74 26 
यशस्वी पास 1029 202 
एकूण धाव 137 कि.मी. 146 कि.मी. 
यलो कार्डस्‌ 1 2 
फाऊल्स 5 19 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com