बंगालचा सलग दुसरा विजय

बंगालचा सलग दुसरा विजय

सेनादलास एका गोलने नमविले; चंडीगडची मेघालयावर मात
पणजी - संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 31 वेळा जिंकलेल्या पश्‍चिम बंगालने मंगळवारी यंदाच्या स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला. "अ' गटातील चुरशीच्या लढतीत त्यांनी गतविजेत्या सेनादलास एका गोलने हरविले. सामना बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झाला. उत्तरार्धात दोन्ही संघांचा प्रत्येकी एक खेळाडू कमी झाला.

वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या "अ' गटातील आणखी एका सामन्यात चंडीगडने मेघालयास 2-1 अशा फरकाने हरविले. सामन्याच्या भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे चंडीगडने आज विजयाची चव चाखली.
सलग दुसऱ्या विजयामुळे "अ' गटात आता बंगालचे सहा गुण झाले आहेत. सेनादलाचा हा पहिलाच सामना होता. पहिल्या लढतीत बंगालविरुद्ध पराभूत झालेल्या चंडीगडने आजच्या विजयासह तीन गुण प्राप्त केले.

गोव्याविरुद्धही पराभूत झालेल्या मेघालयास आज सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

सेनादलाच्या संघात आयएसएल स्पर्धेत दिल्ली डायनॅमोजकडून खेळणारा मध्यरक्षक अर्जुन तुडू याचा समावेश होता. माजी विजेत्या बंगालचे प्रशिक्षक मृदूल बॅनर्जी यांनी आज 4-4-2 संघ रचनेस प्राधान्य दिले. बंगालने सामन्याच्या 22व्या मिनिटांस आघाडी घेतली. सेनादलाचा बचावपटू एन. हिरोजीत सिंग याला आपटून रिबाउंड झालेल्या चेंडूवर एम. बसंत सिंग याने बंगालचे खाते उघडले. सामन्याच्या उत्तरार्धाच्या सुरवातीस सेनादलास बरोबरी साधण्याची संधी होती, परंतु महंमद इर्शाद याचा ताकदवान फटका बंगालचा गोलरक्षक शंकर रॉय याने वेळीच रोखला. सेनादलाचा एक खेळाडू 73व्या मिनिटांस कमी झाला.

सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे अर्जुन तुडू याला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. 78व्या मिनिटास मानवीर सिंग याने गफलत केल्यामुळे बंगालची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. सामन्याच्या 89व्या मिनिटाला बंगालच्या मोनोटोश चक्‍लादार याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदानाबाहेर जावे लागले.

चंडीगड यशस्वी
वास्कोत चंडीगडने पिछाडीवरून मुसंडी मारली. मेघालयाने 51व्या मिनिटास कितबोक्‍लांग पाले याच्या गोलमुळे आघाडी घेतली. सामन्याच्या 64व्या मिनिटास गगनदीप सिंगने हेडरद्वारे चंडीगडला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या भरपाई वेळेत सेहिजपाल सिंग याच्या गोलमुळे चंडीगडने विजयासह गवसणी घातली.

निकाल (अ गट)
- पश्‍चिम बंगाल वि. वि. सेनादल, 1-0
- चंडीगड वि. वि. मेघालय, 2-1

आजचे सामने (गट ब)
- रेल्वे विरुद्ध केरळ (बांबोळी)
- पंजाब विरुद्ध मिझोराम (वास्को)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com