इंग्लंड फुटबॉलचे विश्‍वविजेते

संजय घारपुरे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

कोलकाता - इंग्लंडने वयोगट फुटबॉल स्पर्धांचे आपणच जागतिक राजे आहोत, हे सिद्ध केले. त्याचबरोबर पिछाडीनंतरही इंग्लंड जिंकू शकते, हेही दाखवून दिले. इंग्लंडने विश्वकंरडक २० वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेपाठोपाठ काही महिन्यांतच विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा जिंकली आणि स्पेनला पुन्हा एकदा अंतिम फेरीत जिंकण्यात अपयश आले.

कोलकाता - इंग्लंडने वयोगट फुटबॉल स्पर्धांचे आपणच जागतिक राजे आहोत, हे सिद्ध केले. त्याचबरोबर पिछाडीनंतरही इंग्लंड जिंकू शकते, हेही दाखवून दिले. इंग्लंडने विश्वकंरडक २० वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेपाठोपाठ काही महिन्यांतच विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा जिंकली आणि स्पेनला पुन्हा एकदा अंतिम फेरीत जिंकण्यात अपयश आले.

कोलकातावासींसाठी आजचा दिवस नक्कीच संस्मरणीय ठरला. त्याच्या ब्राझील आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी बाजी मारली. ब्राझीलने गोल मोलाचे असतात हेच दाखवले, तर इंग्लंडने सामन्यातील वर्चस्वाचे रूपांतर करताना थ्री लायन्सची ताकद केवळ फुटबॉलची सर्वांत मोठी प्रीमियर लीग आयोजनात नाही, तर जगावर वर्चस्व राखणारे कुमार फुटबॉलपटू घडवण्यात आहे, हेही दाखवले.

 त्यांनी उत्तरार्धात चार गोल करतानाच स्पेन आक्रमकांना जखडून ठेवले. इंग्लंडने मे-जूनमध्ये दक्षिण कोरियात झालेली विश्वकरंडक २० वर्षांखालील स्पर्धा जिंकताना व्हेनेझुएलास १-० हरवले होते. त्यापेक्षा सफाईदार विजय त्यांनी कोलकात्यात मिळविताना स्पेनला ५-२ असे हरवले. 

इंग्लंडने उत्तरार्धात सूत्रे पूर्णपणे आपल्याकडे घेतली. त्यात स्टीवन सेसॅगन याचा मोलाचा वाटा होता. उत्तरार्धात इंग्लंडच्या आक्रमणात जास्त सफाई आली. त्यांनी स्पेनला सुरुवातीस बॅकफूटवरच नेले होते. मध्यरेषाही पार करणे स्पेनसाठी अवघड झाले होते; मात्र या वर्चस्वाचे गोलात रूपांतर करण्यात सेसॅगनने मोलाचा वाटा उचलला. त्याच्याच पासवर गिब्ज व्हाईटने इंग्लंडला बरोबरी साधून दिली, तर ११ मिनिटांतच फिलिप फॉडेन याने इंग्लंडला सामन्यात प्रथमच आघाडीवर नेले. याच सेसॅगनने ७४ व्या मिनिटास व्हिक्‍टर चस्ट हेडरवर गोल करणार, असे वाटत असतानाच सेसॅगनने गोललाईनवर चेंडू अचूक रोखला. या उंचावलेल्या बचावापासून प्रेरणा घेताना फॉदेन आणि मार्क गुएही यांनी चार मिनिटांच्या अंतराने गोल करीत स्पेन प्रतिकाराची आशाच संपुष्टात आणली. 

सामन्याच्या सुरुवातीस आपल्या पारंपरिक छोट्या पासेसवर भर देण्याचा खेळ इंग्लंड करत आहे. हे पाहून स्पेनने प्रतिआक्रमणावर त्याचबरोबर इंग्लंड बचावफळीस आगळ्या प्रकारे गुंगारा देण्याची चाल वापरली होती. स्पेनचे पूर्वार्धातील दोन्ही गोल सर्जीओ गोमेझ याने केले.

लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनाशी करारबद्ध असलेल्या गोमेझच्या दोन्ही गोलच्यावेळी इंग्लंडचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. जुआन मिरांडाच्या पासवर हे गोमेझने दोन्ही गोल केले होते. या दोन्ही गोलच्यावेळी इंग्लंड बचावपटूंचे लक्ष मिरांडाकडेच होते. पहिल्या गोलच्यावेळी गोमेझ ऐनवेळी गोलपोस्टवर आला होता, तर दुसऱ्या गोलच्यावेळी मिरांडाची कोंडी इंग्लंडच्या तीन बचावपटूंनी केली; पण त्यातूनही मिरांडाने चेंडू पास केला तो गोमेझकडे. गोमेझच्या अचूक किकने ही संधी साधली. या दोन्ही गोलचा पाया ॲबेल रुईझ आणि सीझर गिल्बर्ट यांच्या पासने. या दोघांनी दोन्ही बगलातून एकमेकांकडे सोपवलेला चेंडू जबरदस्त होता. 

इंग्लंडचे खाते उघडले ते निर्णायक लढतीपूर्वी सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत आघाडीवर असलेल्या रिॲन ब्रेवस्टरने. इंग्लंड चेंडूवर वर्चस्व राखत होते. आक्रमणाच्या संधी निर्माण करीत होते; पण त्यांना गोल करण्यात अपयश येत होते. यामुळे काहीशा निराश होत असलेल्या सहकाऱ्यांना पाठीराख्यांना ब्रेवस्टरच्या गोलने संजीवनीच दिली. 

सर्वाधिक प्रेक्षकांचाही विक्रम
भारतातील १७ वर्षांखालील स्पर्धेने १३ लाख ४७ हजार ३७६ प्रेक्षकांचा विक्रम केला. या स्पर्धेतील ब्राझील-माली या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीस ५६ हजार ४२२ चाहते उपस्थित होते, तर विजेतेपदाच्या लढतीस ६६ हजार ६८४ चाहत्यांचा प्रतिसाद लाभला. त्यामुळे चीनमधील स्पर्धेतील सर्वाधिक १२ लाख ३० हजार ९७६ प्रेक्षकांच्या उपस्थितीचा विक्रम मोडला गेला. त्याचबरोबर भारतीय उपखंडातील २०११ च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या १२ लाख २९ हजार ८२६ चाहत्यांची संख्याही मागे पडली.

सर्वाधिक गोलचा विक्रम
भारतातील स्पर्धा सर्वार्थाने विक्रमी ठरत आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक गोल या स्पर्धेत नोंदले गेले आहे. यापूर्वीचा १७२ गोलचा विक्रम होता. अखेरच्या दिवसातील दोन लढतींपूर्वी १७० गोल झाले होते. ब्राझील-माली या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत दोन गोल झाले, तर स्पेन-इंग्लंड या अंतिम लढतीत सात गोल झाले. त्यामुळे या स्पर्धेत एकंदर १७९ गोल झाले.

विजेतेपद अनेक अर्थाने सुखावणारे आहे. आम्ही दोन गोलनी पिछाडीवर होतो; पण त्यानंतर जबरदस्त प्रतिकार केला. आम्ही कधीही हार मानली नाही. आमच्यावर गोल झाले तरीही आम्ही योजनेनुसारच खेळ केला. इंग्लंड फुटबॉलची संघउभारणी योग्य दिशेने सुरू आहे, हेच त्यातून दिसले
- स्टीव कूपर, इंग्लंड मार्गदर्शक

थ्री लायन्सची विजयी डरकाळी
इंग्लंडचा रिॲन ब्रेवस्टर हा गोल्डन बूटचा मानकरी. त्याचे या स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल 
इंग्लंडने ही स्पर्धा प्रथमच जिंकली
इंग्लंडने या स्पर्धेतील सर्व लढती जिंकल्या
यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी २००७ च्या स्पर्धेत. त्या वेळी उपांत्यपूर्व फेरीत हार
विश्वकरंडक १७ वर्षांखालील स्पर्धा जिंकणारा इंग्लंड हा नववा संघ. यापूर्वी ही कामगिरी नायजेरिया, स्वित्झर्लंड, मेक्‍सिको, ब्राझील, फ्रान्स, घाना, सौदी अरेबिया आणि सोविएत संघराज्याची
ही स्पर्धा जिंकणारा इंग्लंड हा चौथा युरोपिय देश. यापूर्वी ही कामगिरी स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि सोविएत संघराज्याकडून
स्पेन चौथ्यांदा उपविजेते. यापूर्वी १९९१, २००३ आणि २००७ च्या स्पर्धेत 
ब्राझीलचा गॅब्रिएला ब्रॅझाओ हा सर्वोत्तम गोलरक्षक
ब्राझीलला तिसऱ्या क्रमांकाबरोबरच फेअर प्ले पुरस्कारही
स्पेन स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात पराजित