शाळेच्या गच्चीवर साकारले फुटबॉल मैदान

शाळेच्या गच्चीवर साकारले फुटबॉल मैदान

पुणे - शाळेला मैदान नाही अशी आजची स्थिती असली, तरी पुण्यातील सहकारनगर परिसरात असणाऱ्या संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेने यावर अफलातून मार्ग शोधून काढला आहे. संस्थेचे कार्यवाह विनायक जांभोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांतून त्यांनी संस्थेच्या विद्या विकास विद्यालयाच्या गच्चीवर चक्क फुटबॉलचे मैदान साकारले आहे.

या मैदानाचे शनिवारी (ता. ७) उद्‌घाटन करण्यात आले. मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण आणि त्याहीपेक्षा तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज लक्षात घेऊन विद्या विकास विद्यालयाने हे पाऊल उचलले आहे.

सहकारनगरसारख्या दाट वस्तीत असलेल्या या शाळेने आपले छोटे मैदानही चांगले विकसित केले असून, जागेचा वापर करत क्रीडासंकुलही उभारले आहे. फुटबॉलचे टर्फ मैदान हा त्यांचा नवा प्रकल्प. योगायोगाने १७ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू असतानाच हे मैदान साकारले गेले हे विशेष. शाळेच्या क्रीडासंकुलाच्या टेरेसवर ८० फूट लांब व ४० फूट रुंदीचे हे टर्फ मैदान भविष्यात फुटबॉलप्रेमींसाठी आकर्षण आणि आदर्श ठरणार यात शंकाच नाही. मैदान गच्चीवर असले, तरी ते पूर्णपणे सुरक्षित आहे. ५ बाय ४ फूट उंचीचा कठडा, त्यावर उंच रेलिंग आणि वरच्या बाजूसह चारही बाजूंनी जाळीने हे मैदान आच्छादले आहे.

संस्थेचे कार्यवाह विनायक जांभोरकर म्हणाले, ‘‘क्रीडासंकुल उभारून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड जोपासण्याच यापूर्वीच सुरवात केली होती. काही तरी नवे करायचे याचा विचार सुरू असताना मित्र फुटबॉलपटू राजेश गोवंडे याच्याशी चर्चा करताना फुटबॉलला जोडून काही तरी करण्याचे ठरले. जागेचा प्रश्‍न होता. पण, टर्फचा उपयोग करून टेरेसवर मैदान उभे राहू शकेल हे समजले तेव्हा नेटाने तयारी सुरू केली. सध्या फुटसालच्या माध्यमातून प्रचलित होत असलेल्या फाइव्ह ए साइड फुटबॉलसाठी हे मैदान उपयुक्त ठरू शकते. तयारीला सुरवात केल्यापासून सहा महिन्यांत हे ‘टर्फ’ आम्ही उभे केले. इबॅको इंडिया या कंपनीने हे टर्फ विकसित केले आहे.’’

संस्थेच्या शाळेच्या आवारात असलेल्या क्रीडासंकुलात विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, स्केटिंग रिंग, योगासन, कराटे अशा खेळांचे हॉलही आहेत. विशेष म्हणजे शाळेत क्रीडा विषय अजूनही सक्तीचा होत नसला, तरी या शाळेने स्वेच्छेने हा विषय सुरू केला असून, शालेय तासिका सांभाळून विद्यार्थ्यांना या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. या संदर्भात जांभोरकर म्हणाले, ‘‘आज विद्यार्थी क्रमिक अभ्यासात इतका अडकला आहे की, त्याला खेळाकडे लक्ष द्यायलाही वेळ होत नाही. पण, म्हणून खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुलांनी खेळायलाच हवे.

आपल्या शाळेत सुविधा आहेत, तर त्याचा उपयोग या विद्यार्थ्यांनी घ्यावा, अशी कल्पना पुढे आली. पालकांनीही साथ दिली. त्यामुळे आज आम्ही शाळेच्या वेळेत मुलांना या खेळाचे प्रशिक्षण देतो.’’ विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संस्थेने आता भविष्यात बास्केटबॉल, टेनिस, बॉक्‍सिंग रिंग असे ‘मल्टिकोर्ट’ मैदान उभारण्याचे स्वप्न पाहिले आहे.

आमचे विद्यार्थी स्पर्धांमध्ये सहभागी होतात. पण, आम्ही सहभागाची जबरदस्ती करत नाही. आमच्यासाठी पदक, बक्षीस महत्त्वाचे नाही. मुलांनी खेळणे आणि त्यांना तंदुरुस्तीचे महत्त्व पटणे हाच आमचा क्रीडासंकुल उभारण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 
- विनायक जांभोरकर, विद्या विकास प्रशालेचे कार्यवाह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com